Friday, February 25, 2011

And it happened again.. after a loooooooong time.. but IT HAPPENED!!

A unique experience...
 
Learning.
A joy of creating; constructing something new.

Doing things which were not too obvious before.
Visualizing facts which were abstract in their own way.


A merry heart..jumping; exactly like a small kid jumps with joy when it watches his kite flying all way up in the sky...

Friday, February 4, 2011

सहप्रवासी

 त्या दोघी, बेंगलोर-पुणे प्रवासात भेटलेल्या. अनपेक्षितपणे लांबलेल्या प्रवासात झालेली मैत्री.. की नुसतीच ओळख??...काहीही असो. सुरुवातीच्या काही तासांमधला तो अलिप्तपणा कधी विरघळून गेला कळलंही नाही. त्यातल्या त्यात ती एक जास्तच बोलकी. तितकीच निरागस. परीक्षा संपल्या संपल्या घरच्या ओढीनं मिळेल त्या गाडीनं जायचं म्हणून त्या गाडीत चढलेल्या. नेमका काही अपरिहार्य कारणांमुळे गाडीला उशीर. सुरुवातीच्या गप्पा अगदी जुजबी. ’ती’ चा ’तो’ ही त्याच गाडीत दुसर्‍या एका डब्यात. त्या दोघी आणि तो.. एक त्रिकोण. ’ती’ दुःखी. माझ्यासारख्या तिर्‍हाईतापाशी ’ती’ नं तिचं मन मोकळं केलं. ’दीदी, तुम ही बताओ मै क्या करूं??’ वर सल्ल्याचीही अपेक्षा. मी काय सल्ला देणार? कपाळ??? शेवटी कसंबसं चारदोन गोष्टी सांगून शांत केलं. प्रवास संपताना माझी पावलं माझ्याच नकळत जड झाल्याचं जाणवलं. ’ती’ने दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधायचा प्रयत्नही केला. संपर्क होऊ शकला नाही.


त्या आजी, त्याच प्रवासात भेटलेल्या. मुलीच्या घरी चाललेल्या. गाडी लेट आहे हे मुलीला माझ्या फोन वरून कळवलं. मुलगी काळजीत. सतत काही वेळाने संपर्क करत होती. व्यवस्थित सुखरूपपणे घरी पोहोचल्यावर पुन्हा त्यानी मला फोन केला. आभार मानण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी..


ते काका, रेल्वेत आम्ही संगणक वापरत असलेला पाहून लगेच त्यानी जुन्या गाण्यांची फर्माईश केलेली. मस्तपैकी गाणी ऐकत झालेला तो लांबलचक प्रवास कधी संपला ते कळलंही नाही.


ती, स्वारगेट-कर्वेनगर या संध्याकाळच्या वेळी रहदारीमुळे तास-सव्वा तास खाणार्‍या प्रवासात भेटलेली. ती च्या मांडीवर एक दोन-एक वर्षाची मुलगी. ’ती’ चांगली एल. एल. बी झालेली. एल. एल. एम ची तयारी करत होती. अगदी संसार संभाळून. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय प्रेमविवाह. सुरुवातीला सगळे आलबेल. लग्नानंतर मात्र घरच्या बाईने घरची जबाबदारी संभाळावी, माणसांचे हवे-नको ते बघावे असा सूर. माहेरचा आधार तुटलेला. त्यामुळे कात्रीत सापडलेली. त्या तासाभराच्या प्रवासात ’ती’ ने तिची व्यथा माझ्यासमोर मांडली. सांत्वन करण्यापलिकडची अवस्था. माझा थांबा आल्यावर मी उतरले.. ’ती’ मात्र तशीच मनामध्ये घोटाळत राहिली.


’ती’, माझी सख्खी मैत्रीण. तब्बल पाच वर्षे आम्ही एकाच बेंचवर बसायचो. शाळा संपल्यावर वाटा वेगळ्या झाल्या. सुरुवातीला असणारा सम्पर्क हळूहळू कमी होत बंद पडला. अचानक कधी तरी कुणाकडून तिच्या बद्दल समजलं. थोडं वाईटच वाटलं. अजूनही असं वाटतं अचानक ती समोर येउन उभी राहील..’काय ओळखलं का?’ असं विचारेल..आणि मी डोळ्यातलं पाणी हलकेच पुसून हसून म्हणेन.. ’गधडे, कुठे होतीस इतके दिवस??’

आपल्याला सतत वेगवेगळी माणसं भेटत असतात. निमित्त काहीही असो. काहींशी पटकन मैत्र जुळतं. काहींच्या बाबतीत कटू आठवणीही. थोड्या काळासाठी आपल्या आयुष्यात आलेली अशी माणसं. सहप्रवास काही क्षणांपासून काही वर्षांपर्यंतचाही... अचानकपणे अशाच आठवणी येतात.. मनात तरंग उमटवून जातात. काय करत असतील ही सगळीजणं आत्ता? कशी असतील? यापैकी किती जणांनी मला लक्षात ठेवलं असेल? किती जण माझी आठवण काढत असतील? असतीलही कदाचित.

कधी अनपेक्षितपणे त्यांची भेट झाली तर...