Tuesday, October 11, 2011

रंगीत तालीम

पत्त्यांचा बंगला..  लहानपणीचा हा एक आवडीचा उद्योग. एकाशेजारी एक त्रिकोणी आकारात पत्ते उभे करायचे. त्यावर अलगद एक एक पत्ता आडवा ठेऊन त्यावर पुन्हा एकदा एक आख्खा मनोरा रचायचा. त्यावर आणखी एक.. त्यावर आणखी एक..हळूच दाराच्या फटीतून.. कधी खिडकीतून येणारी चुकार झुळूक तो कष्टाने उभारलेला मनोरा जमीनदोस्त करायची; तर कधी आपलाच धक्का लागून त्याची धूळधाण व्हायची. हिरमुसलेल मन पुन्हा एकदा ताज्या दमाने बंगला बांधायला निघायचं. न थकता.



आजकाल पत्त्यांचे बंगले नाही बांधले जात.. बांधले जातात ते स्वप्नांचे.. भाबड्या आशेने रचत जातो एकावर एक स्वप्नाचे मनोरे.. कधीतरी कुठलातरी परिस्थितीचा फटका बसतो, आणि त्या स्वप्नाचा मनोरा ढळतो ..कधी पूर्णच कोसळतो तर कधी अर्धवट.
तरीही आपण हरत नाही .. नव्या जिद्दीने, नव्या उत्साहाने तयार होतो.. सिद्ध होतो पुन्हा एकदा ताज्या दमाने नवीन मनोरे बांधायला.. वेगळ्या तऱ्हेची, वेगळी पानं घेऊन..





लहानपणचे  असे खेळ हे पुढच्या आयुष्याला तोंड देण्यासाठीच्या रंगीत तालमीच असाव्यात..