Wednesday, June 26, 2013

The countdown has already begun.

Monday, May 13, 2013

तसं पाहायला गेलं तर माणसाच्या आयुष्यात आठवणीत राहण्यासारखे अगणित असे प्रसंग घडत नाहीत. रोजच्या रोज नवीन अशा प्रसंगांना सामोरं जाणारा माणूस सापडायला विरळाच. त्यामुळे असे काही मोजके प्रसंग सतत स्मरून त्या आठवणीत हरवून जाण्याची माणसाची सवय अगदी जुनीच म्हणावी लागेल. अगदी आजी आजोबा नातवंडाना ज्या गोष्टी सांगतात त्या बहुधा त्याच त्याच असतात. अर्थातच तरीही त्यांची गोडी जराही कमी होत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे.

आपल्या आठवणींच्या कप्प्यात जतन करून ठेवेलेले असे मोजकेच का होईना प्रसंग वारंवार आठवून त्यात हरवून जाण्याचा आपला स्वभाव असतो. मुळात अशा आयुष्यभर जतन करून ठेवण्यासारख्या गोष्टी तुमच्या कडे असल्या तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात यात तिळमात्र शंका नाही.


हे पाल्हाळ सांगण्याच कारण म्हणजे माझ्या अवतीभवती असलेल्या लोकांना सदैव मुदुमलाईच कौतुक ऐकून वैताग येतही असेल कदाचित, पण तरीही त्या आठवणींमध्ये रमून जाणे हा कदाचित माझा छंद होऊन बसला आहे. आठवणी थोड्याच आहेत. पण तरीही माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या आहेत.


पंधरा दिवसांपूर्वी मुदुमलाई सोडल्याला एक वर्ष होऊन गेलं. फार काही जास्त फिरलो अशातला भाग नाही, उलट आमचं घर, आमचं गाव, आणि गावाच्या वेशीपलीकडला फार तर फार एखादा किलोमीटर पर्यंतचा भाग इतकाच आमचा जास्तीतजास्त वावरण्याचा भाग होता. तरीही जवळपास तीन वर्षांच्या वास्तव्यात तिथला प्रत्येक ऋतु मनसोक्त अनुभवला, प्रत्येक दिवशीच्या सायं छटा नव्याने अनुभवल्या. (लोभी मन तरीही जास्त हावरटपणा करत जातं. ) आणि या आठवणींची झिंग अजूनही मनातून उतरली नाहीये.


आठवणींच्या एका पर्वाचा शेवट झाल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या गोष्टी पुन्हा बोलून दाखवाव्याशा वाटल्या त्यानिमित्त हा लेखनप्रपंच!