Saturday, October 10, 2015

उन्हाळा

सध्या इथे मेलबर्नला उन्हाळा सुरु झालाय. इथे खरं तर मी गेल्याच उन्हाळ्यात आले. पण भारतातून आल्या आल्या इथे उन्हाळ्याचं महत्त्व जाणवलं नाही. आपल्याकडे उन्हाची काय कमतरता?! पण इथला एक हिवाळा काढला आणि मग इथले सगळे लोक उन्हाची आणि उन्हाळ्याची इतकी आसुसून वाट का पाहतात ते चांगलंच समजलं.

आज बाहेर खूप छान वातावरण आहे. एक प्रसन्न संध्याकाळ. माझं मन संधी मिळेल तेव्हा भारताची सफर करून घेत असतंच. आजही वेगळं नाहीच.

दिवसभराच्या कडक उन्हानंतर सूर्य मावळतीला जाताना हलके हलके हवेत वाढणारा गारवा... तो संधिप्रकाश... कधी हलकी झुळूक तर कधी जोर धरलेला वारा... त्या हवेबरोबर नाकाला भिडणारा तो तप्त मातीचा गंध... हळूहळू गडद होत जाणारा अंधार... दिवेलागण... देवघरातली मंद तेवणारी समई आणि घरभर दरवळून राहिलेला उदबत्तीचा वास.

आठवणींचा फेर, आणखी काय!

Tuesday, May 19, 2015

एका वेदनेची अखेर

अरुणा शानभाग. खरं तर हे नाव माझ्या जास्त परिचयाचं असण्याचं काही कारण नाही. तिचं अस्तित्व माझ्यासाठी एका वर्तमानपत्रातल्या बातमीपुरतं मर्यादित आहे, किंवा आता होतं म्हणावं लागेल. तिच्या आयुष्यावर बेतलेली 'अरुणाज स्टोरी' मी वाचलेलं नाही. माझा जन्म झाला तेव्हा तिच्यावर बलात्कार होण्याच्या घटनेला एक तप उलटून गेलं होतं. आयुष्यातल्या ६५ वर्षांपैकी तब्बल ४२ वर्षे कोमा मध्ये गेलेल्या अरुणा ची मृत्यूने अखेर सुटका केली. तिचं जाणं मनाला चटका लावून तर गेलंच, पण त्याबरोबर कितीतरी प्रश्नांचं काहूर माझ्यापाशी ठेवून गेलं. स्वतः न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा किती भोगावी लागावी याला काही मर्यादा आहे? दयामरणाचा हक्क असणे बरोबर की चूक याबद्दल विचार करणारी मी कोण? पण रोज तीळ तीळ मरण्यापेक्षा, एकदाच काय ते मरण येऊन गेलेलं बरं का नाही? असा विचार नक्कीच मनात खुपत रहातो. आज तिच्या कायदेशीर मृत्यूची बातमी वाचताना 'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'  हे सुरेश भटांचे शब्द या परिस्थितीत किती चपखल बसतात हे जाणवत होतं.

ई सकाळ वर ही बातमी वाचताना सहज वरच्या कोपरयाकडे लक्ष गेलं. '41 likes and 314 dislikes'.
मी कुठे क्लिक करावं?  कुणाच्याही निधनाच्या बातमीला 'Like' कसं करणार म्हणून 'Dislike';  की एका तडफडत्या आत्म्याची अखेर सुटका झाल्याचं बरं वाटलं म्हणून  'Like'?

मला उत्तर अजून सापडलं नाहीये.



Tuesday, April 21, 2015

What I want to say...



As Deep rightly says, '...the most serious loss you suffer when you don't write regularly. You lose the ability to write'.  


I wish things will turn better some day. You know what I mean to say, right? :(

Tuesday, February 10, 2015

हे असं असतं होय!

बऱ्याचदा आपल्यासमोर आलेल्या गोष्टी आपण फारसा विचार न करता गृहीत धरतो. किंवा आपल्याला कोणीतरी सांगितली आहे म्हणजे तशीच असली पाहिजे असा विचार करून शांतपणे स्वीकारतो. बऱ्याच काळानंतर अचानकपणे साक्षात्कार होऊन त्या गोष्टीचा खरं अर्थ उमगतो किंवा ती गोष्ट खऱ्या स्वरुपात आपल्या समोर येते. रियालिटी आपल्या डोक्यातल्या फ्यांटसीजला छेदून जाते आणि एखादी गोष्ट नव्याने उमजते तेव्हा म्हणावसं वाटतं, ओहो.. हे असं असतं होय!

 शाळेत असताना निबंधलेखन हा एक अत्यंत कंटाळवाणा पण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग असायचा. विषयही फारसे वेगवेगळे नसायचे. 'विज्ञान शाप की वरदान' किंवा 'माझा आवडता लेखक' किंवा 'माझी आई' इत्यादी. पण निबंधलेखन हे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी पाहून अनुभवून आपली विचार मते किंवा निरीक्षणे मांडण्याची गोष्ट आहे हे कोणीही सांगितलं नाही. बऱ्याचदा नवनीत चे गाईड्स आणि निबंधामालेसारखी (हातवळणे इ.इ.) रेफरन्स पुस्तके वाचून त्यातील छापील आराखड्यानुसार लिहिले जायचे.  माझी एक मैत्रीण नेहेमी म्हणते, की निबंधाच्या पुस्तकातली आई ही ऑफिसला जाणारी, मुलांचा गृहपाठ घेणारी अशी असते. त्यामुळे तिला नेहेमी असं वाटायचं की अशाच आई वरती निबंध लिहिणं अपेक्षित आहे. तिची आई लवकर उठून भाकऱ्या करणारी, शेतात जाणारी होती. तिच्याहीबद्दल लिहिता येऊ शकतं हे त्यावेळी कोणीतरी सांगायला तर हवं ना! शाळा सोडल्यानंतर बऱ्याच वर्षांनी हे कळलं की हे असं असतं तर!


परवा मी ALDI चं weekly offers booklet चाळत असताना मला एक गोष्ट दिसली. ' Hot Cross Buns' च चित्र होतं ते. त्यावरच्या डिस्काउंट ची माहिती दिली होती. शाळेत असताना 'hot cross buns, hot cross buns, one a penny, two a penny, hot cross buns' अशी एक कविता होती. त्यातले ते buns म्हणजे हेच (त्यावर खरंच क्रीम ने भरलेला क्रॉस असतो! असं असू शकेल असा विचार त्यावेळी कविता शिकताना अजिबात केला नव्हता). ते असे असतात/दिसतात हे आत्ता इतक्या वर्षानंतर समजलं तेव्हा खरच मजा वाटली. असा मी असामी मधल्या शंकऱ्या "म्हणजे तुम्ही मला डुक्कर म्हणता ते हे होय!" असं म्हणतो त्यातली गत :)