सध्या बर्याच पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरु आहे. आमच्या field station च्या अंगणातही कितीतरी संसार फुलले, आणि अजूनही फुलताहेत. त्यापैकी मुख्य उल्लेख करायचा म्हणजे 'purple sunbird'. चिमणीच्या निम्म्या आकाराएव्हढा हा छोटुकला पक्षी. अगदी टीचभर म्हणावा असा. पण अतिशय सुंदर, देखणा. एका जोडीने बागेतल्या एका तारेचा आधार घेउन घरटं बांधलय. अगदी वेगळंच, घरट्याला वरुन टोपी असल्यासारखं. वरुन अगदी ओबडधोबड दिसत असल तरी आतून मात्र अगदी मऊमऊ कापूस आहे.
परवा झालं काय, आम्हाला अचानकच एक डोकं त्या घरट्याच्या तोंडातून डोकावताना दिसलं. अगदी टुकूटुकू बघणारे दोन डोळे आम्हाला निरखत होते. अगदी छोटुले ते भिरभिरे डोळे पाहून आम्ही उड्याच मारल्या. इतका आनंद झाला होता आम्हाला. पण गंमत अशी की, आमच्या हालचाली टिपून ते पाखरू अचानक उडुन गेलं. आणि उडून गेल्यानंतर समजलं की आम्ही ज्याला पिल्लू समजत होतो, ती प्रत्यक्ष sunbird ची मादी होती आणि ती त्या घरट्यात अंडं ऊबवायला बसली होती. एक प्रकारे आमचा पोपटच झाला. तेव्हा फक्त डोक्याचा थोडासाच भाग दिसत असल्यामुळे असं झालं. खरच पूर्ण वाढ झालेला पक्षी इतका छोटा तर पिल्लू तर किती छोटं असेल? लवकरच कळेल !!
आणखी एका बुलबुलच्या जोडीनेही आपला संसार थाटला आहे. घरटं बांधायला अशी मोक्याची जागा शोधून काढली आहे, की कौतुकाची थाप मारावीशी वाटली त्याच्या पाठीवर! खरच, बाहेरुन बघितल तर कळणारच नाही अशा ठिकाणी Croton नावाच्या (हे माझं ज्ञान नव्हे, आमच्या इथल्या botanists च्या कृपेने हे नाव इथे लिहिलय. चुकलं असल्यास कं. ज. ना.!) झुडूपाच्या अगदी आतल्या बाजूला नाजूकशा फांद्यांच्या आधाराने बांधलय. अगदी साधंसच आहे. पण perfection म्हणजे काय हे शिकण्यासाठी त्यांच्याकडे class लावावा इतकं सुबक आहे. सध्या तरी तीन अंडी आहेत.
तर आम्ही उत्सुकतेनं वाट बघतोय सगळ्या पिल्लांची...P.S. १) कं. ज. ना.: कंपनी जबाबदार नाही!
२) अजुनही कळलं नाही?? मग व. पुं. चं infection नावाचं कथाकथन ऐका. नक्की कळेल!
३) हे कथाकथन internet वर मिळाल्यास मला नक्की कळवा. न मिळाल्यास कं. ज. ना!