परवाचीच गोष्ट.
काही दिवसांपूर्वीच आम्ही नव्या घरात रहायला गेलोय. हे नवं घर आमच्या जुन्या घरापासून थोड्याशाच अंतरावर आहे. त्या भागात एक माकडांची टोळी सुद्धा राहते. रोज सकाळी सकाळी छपरावरती दणादण उड्या मारण्याच्या त्यांच्या सवयीची आम्ही हळूहळू सवय करून घेत आहोत. आम्ही इथे येण्यापूर्वी हे घर रिकामंच होतं. ही सगळी मंडळी त्या घरात कधीही जाऊनयेऊन असायची. त्यामुळे आम्ही गेल्यावर पहिले काही दिवस आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून होतो आणि ते आमच्यावर!! आम्ही असल्यामुळे त्यांच्या अगदी घरातल्या अंगणात वगैरे येण्यावर बंधनं आली खरी... तर झालं काय, त्या टोळीतल एक माकड (अगाऊ कार्टं!) त्या दिवशी आलं होतं. मी अचानक त्याच्या समोर आल्यामुळे ते दचकलं आणि मी सुद्धा थोडी टरकलेच... तसं जाळीचे दार असल्यामुळे काही काळजी नव्हती. तर आता मी होते जाळीच्या एका बाजूला घरात आणि ते होतं बाहेर. म्हणजे उलटी परिस्थिती- मी जणू पिंजर्यात होते आणि माकड मला पिंजर्याच्या बाहेरून न्याहाळत होतं. दोन मिनिटं आम्ही दोघेही एकमेकांकडे डोळे वटारून पहात होतो. दोघेही एकमेकांचा अंदाज घेत होतो. दोघांनाही माहीत नव्हतं की समोरचा प्राणी नक्की काय विचार करतोय. आपल्याला घाबरलाय, की आपल्यावर हल्ला करण्याच्या बेतात आहे की पळून जाण्याच्या विचारात आहे. अशा बिकट परिस्थितीत बराच वेळ गेला. समोरचा काहीच करेना म्हणून शेवटी आम्ही दोघेही वैतागलो आणि आपापल्या कामाला निघून गेलो!
मागच्या आठवड्यात आम्ही २० गव्यांचा कळप पहिला. २० गव्यांचे ४० डोळे आम्हाला आणि आम्हा ५-६ जणांचे १५-१६ (चष्म्याचे २-२ एक्स्ट्रा धरुन!) त्यांना बराच वेळ निरखत होते. शेवटी आम्हाला डॊळे भरून पाहून घेऊन कंटाळून ते आल्या वाटेने निघून गेले.
त्यावेळेपासून मी विचार करत होते की माणसं समोर आली की प्राणी काय विचार करत असतील?
माणसाला एकंदरीतच सगळ्याच गोष्टींबद्दल कुतुहल असतं. खरंच किती क्रेझी असतात लोक प्राणी बघण्यासाठी. जगाच्या कुठल्याकुठल्या कोपर्यात भटकतात. तहानभुकेची पर्वा न करता रानोमाळ हिंडतात..जीवाचा आटापिटा करतात. एव्हढं करुन मिळतं काय? एखाद्या प्राण्याची निसटती छबी. त्या एखाद्या प्राण्याचं केवळ ओझरतं दर्शन घेण्यासाठी इतका अट्टाहास? पण तरीही हौस ना...
बरं, आणि काही काही लोकांना हरणं किंवा हत्ती नुसते दिसून उपयोग नाही.. ऊं!! त्यात काय, हत्ती तर आहे. आम्हाला वाघ बघायला हवा.. अरे, हे काय?
बरं बघितला समजा वाघ, पुढे काय? काय करतो आपण त्याचं नंतर?
आणि प्राणी बघायचे म्हणजे नक्की काय? हत्ती गवत खातो कसा, हत्तीचे दात, सोंड किती कौतुकाने न्याहाळतो आपण. हत्तीला याबद्दल काय वाटत असेल? कधी कधी असं वाटतं एखादा हत्ती चिडून सोंड वेळावून अचानक म्हणेल, काय शिंची कटकट आहे, किती गोंधळ घालतायत ही माणसं, निवांतपणे गवत पण खाऊ देत नाहीत. एक सोंडेने रपाटा हाणला म्हणजे कळेल बेट्यांना.
वाघोबाची तर गोष्टच वेगळी. त्याच्या चालण्यावरही लोक फिदा होतात. पण समजा, नसली एखाद्या वाघाची चाल ऐटदार, म्हणून काय मग त्याच्या ’वाघोबा’ पणाला बाधा येते काय? त्याला नसेल का असं वाटत - साली माणसाची जातच विचित्र ! सुखाने शिकार करु, चार घास खाउन मस्तपैकी डरकाळी फोडून निवांतपणे ताणून द्यावं म्हटलं तर ते नाही. उठसूट आपले माझ्या मागे. जरा प्रायव्हसी म्हणून मिळू देईनात की...
खरंच कल्पना करा हं, आपण जेवताना आपण घास कसा तोडतो, किती मोठा घास घेतो, कसा तोंडात घालतो, किती मोठा ’आ’ करतो, किती पटकन गिळतो वगैरे वगैरे गोष्टी सदैव कुणीतरी निरखून निरखून बघू लागलं तर ? आपण चालतो कसं, बसतो कसं, किती डौलदार चाल आहे किंवा किती शेळपट वाटतोय इत्यादी इत्यादी कमेंट्स जर उठसूट आपल्यावर कुणी करु लागलं तर कसं बरं वाटेल आपल्याला?
प्राण्यांना नसेल का हो असं काही वाटत?
hahaha...sahich lihalay! agdi patla :D
ReplyDeletekharach vichaar karnyaasaarkha aahe
@Vinay: :D
ReplyDelete