Saturday, October 2, 2010


आमच्या इथल्या किराणामालाच्या दुकानात बरेच लोकल ब्रँडचे मस्त पदार्थ मिळतात. संध्याकाळी टाईमपास म्हणून खायला आम्ही बरेचदा असल काहीतरी आणत असतो. त्यातून काल आम्हाला एक नवीन शोध लागला. ’येळंदपळं ज्यूस’ म्हणजेच आपला मराठमोळा बोराचा गोड गर. असलं काहीतरी खाउन खरच कितीतरी वर्षं झाली आहेत. त्यामुळे शाळा कॊलेजच्या दिवसात मी केव्हा जाउन पोहोचले माझं मलाच कळलं नाही.

शाळेच्या बाहेर हातगाडीवर किंवा जवळच्याच दुकानांमधे मिळणारे आणि छोट्या शाळकरी मंडळींना भुरळ घालणारे असंख्य छान छान पदार्थ म्हणजे चिंचा, आवळे, चिनी-मिनी बोरं, पेरु, बोरकूट, चिंचगुळाच्या कांड्या, मक्याची कणसं इत्यादी इत्यादी बरेच काही. रोज शाळा सुटताना आणि मधल्या सुट्टीमधे असे पदार्थ विकणार्‍या आज्यां- आणि काका -लोकांभोवती गर्दीचा महापूर जमायचा.
आजकाल ’Bingo’ किंवा 'Lays'  असल्या महाग आणि किंमतीच्या मानाने पदार्थ कमी आणि हवाच जास्त असल्या हिशोबाने मिळणारे पदार्थ खाताना होणारं समाधान आणि त्यावेली २५ पैशात मिळणारी बोरकुटाची एक पुडी खाऊन मिळणारा आनंद याच्यात खरंच जमीन-अस्मानाचा फरक आहे.
बाहेरून विकत घेउन खाण्यात त्यावेळी एक वेगळीच मजा वाटायची.

वडापाव ही गोष्ट शाळेत असताना वर्ष-सहामहिन्यांनीच मिळणारी. सहामाही आणि वार्षिक परिक्षा झाल्यावरच आम्ही खायचॊ. तेसुद्धा नववी दहावीत गेल्यावर. त्यावेळी पण वडापावचे काय अप्रूप वाटायचे. नंतर कॊलेजल्या गेल्यावर वडापाव, सामोसा असले पदार्थ नेहमीचे झाले.

अकरावीत असताना एकदा आम्ही असाच उद्योग केला हो्ता. गरवारे कॊलेजच्या मागच्या एस. एम. जोशी पुलाच्या पाशी एक बर्फाचे गोळे विकणारा माणूस असायचा. कदाचित अजूनही असेल. आम्ही एकदा अगदी  lunch break  संपत आल्यावर ठरवलं की चला जाउन बर्फाचा गोळा खाउन येउयात. पुढचं लेक्चर maths चं होतं आणि त्या प्रोफ़ेसर बाई थोड्या खडूस म्हणूनच (कु)प्रसिद्ध होत्या. आमचा वेळेचा अंदाज चुकला. परत आलो तेव्हा लेक्चर सुरु झालं होतं. आम्हाला प्रचंड धडकी भरली होती की आता या काही म्हणणार तर नाहीत ना. कारण तसं जर काही झालं असतं तर पंचाईतच होती कारण आमच्या सगळ्यांच्याच जिभा रंगिबेरंगी झालेल्या. काही प्रश्न विचारले असते तर तोंड उचकटून उत्तर द्यायला केव्हढी लाज वाटली असती! आमच्या सुदैवाने असं काही झालं नाही. थोडा रागीट कटाक्ष सहन करून आम्हाला वर्गात प्रवेश मिळाला आणि आम्ही हुश्श झालो. 
पण आजही असं काही आठवलं की थोडी भीती वाटते आणि थोडी मजाही.

P.S. ही पोस्ट लिहून झाल्यावर परत एकदा वाचली तेव्हा असं वाटलं की, एखाद्या आजीबाईंनी ’आमच्या वेळी असलं काही नव्हतं हो’ किंवा ’आमच्या वेळी किनई..’ अशी सुरुवात करून खूप जुन्या गोष्टी सान्गितल्याच्या सुरात लिहिलं गेलंय. पण खरोखर असल्या गोष्टी करून आणि खाउन खरोखर जमाना उलटून गेल्यासारखं नक्कीच वाटतंय. 

No comments:

Post a Comment