Tuesday, January 4, 2011

पुराण

आज टीव्ही वर एक पौराणिक मालिका बघायचा योग आला. मारनचा असल्या सगळ्या मालिकांवर फार जीव आहे. या मालिका तो रोज न चुकता बघतो. त्यामुळे आज मलाही अर्धा तास ती मालिका ’सहन’ करावी लगली. ’सहन’ अशासाठी की, पौराणिक मालिका बघण्यास हरकत नही पण तमिळ मधे चालू असलेली किती वेळ सहन करणार?? अर्थात असल्या मालिका कळायला भाषा यायलाच हवी हे काही बंधनकारक नाही.

बर्‍याच वर्षांपूर्वी ॐ नम: शिवाय, श्रीकृष्ण, विष्णू पुराण आदी खूप मन लावून नियमितपणे मीही बघितल्या आहेतच. आज मात्र त्यावेळी ज्या भक्तीभावाने बघितल्या होत्या त्या भक्तीचा, किंवा निरागस विश्वासाचा कुठेही मागमूसही शिल्लक राहिला नाहीय अस प्रकर्षाने जाणवलं. कारणमीमांसा करायचीच झाली तर -- १) जास्त शिकल्यामुळे शिंग फुटली आहेत, बाकी काही नाही. २) आजकालच्या पिढीचं काय करावं हेच समजत नाही हो.. सगळे असलेच.. जरा रोज देवासमोर हात जोडून शांत बसा म्हटलं तर ऐकायची सोय नाही. देवाची सुद्धा खिल्ली उडवायला कमी करत नाहीत ही आजकालची पोरं...  इत्यादी इत्यादी विधानांपैकी कुठलही एक चिकटवून टाका बिनधास्त!

पण खरंच, अशा मालिकांतून जे चित्र उभं करतात त्यातून इतके भयंकर प्रश्न पडतात की बस्स.

  • या सगळ्या देवांना (अन दानवांना सुध्दा) रात्रंदिवस तो भरजरी पोषाख आणि दागिने घालणं बंधनकारक असतं का? सगळेजणं आपले सदैव कुठल्यातरी लग्नकार्याला निघाल्यासारखे नटलेले. बरं तरं बरं, बायकांची अवस्था म्हणजे आणखी वाईट. असल्या make up मधे रडायला पण लावतात. पण आज तर height च झाली. वामनाचा जन्म झाल्या झाल्या दुसर्‍या मिनिटाला त्याची आई मस्त टकाटक! (पूर्ण make up मधे with all accessories.. I mean jewellery and all...)  अर्थात हा त्या मालिकेच्या दिग्दर्शकाचा प्रश्न आहे म्हणा. देव जर खरच अस्तित्वात असेल तर त्यालाही असले प्रश्न नक्कीच पडत असणार.. अगदी शंभर टक्के!
  • या सगळ्या देवांच्या आणि दानवांच्या hairstyle आणि कपड्यांमधे प्रचंड फरक. देवांचे (आणि देव्यांचे :-)) पोषाख सगळे पांढरे, bright आणि fresh रंगांचे. आणि दानवांचे मुख्यतः काळपट आणि गडद. हा significant difference खरच असेल का हो? हा दानवांवरती अन्यायच नाही का?
  • हे सगळे ऋषी मुनी म्हणा, देव म्हणा, चौकात भाजीला चालल्यासारखे ’काही नाही, जरा स्वर्गात जाउन येतो’ अस सहज म्हणून गेल्यासारखे सगळीकडे हिंडत असतात. चहाला कैलासावर तर नाश्त्याला वैकुंठात. मजाच असते!
  • काही देव/ऋषी either मृगजिनावर किंवा वाघाच्या/ बिबट्याच्या कातडीवर बसलेले असतात म्हणा किंवा त्यापासून बनवलेले वस्त्र परिधान करत असतात. आजकालच्या युगात ते जर असते तर मनेका गांधीनी नक्कीच case ठोकली असती त्यांच्या विरुद्ध.
  • कधी कधी वाटतं, की एखादा राक्षस चुकून रागाच्या भरात ’हे मूर्ख’ वगैरे संस्कृतोद्भव शिव्या देण्याच्या ऐवजी ’u ediot' असं म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • दानवांची शस्त्रही जाणवण्याइतपत वेगळी असतात बरं का देवांपेक्षा! एखाद्या राक्षसाची तलवार बघा आणि देवाची बघा. उत्तर मिळेल. उत्तराच्या पाठीमागचं कारण मीच अजून शोधते आहे.
  • सगळे देव handsome आणि देव्या beautiful category त, तर दानव शक्य तितके विकृत, विचित्र दाखवले जातात. याला एकही अपवाद सापडणार नाही. बघा शोधून. म्हणजे देवत्व आणि दानव्य हा केवळ physical appearance वरच ठरतो की काय? एखाद्या चांगल्या चेहर्‍याच्या मागे दुष्ट/ क्रूर चेहरा लपलेला असू शकतो ही शक्यता कुठेच consider केली जात नाही. हा दोष कुणाचा?

बरं हे तर झाले मालिकारुपी चित्र उभं करतानाचे दोष. पण आणखी काही technical प्रश्न बरेच आहेत.

  • जेव्हा पृथ्वी समुद्रात बुडवली होती, तेव्हा विष्णूने अवतार घेउन तिला वाचवलं. आता जर पाणी फक्त पृथ्वीवरच अस्तित्त्वात आहे, तर हा आख्खाच्या आख्खा समुद्र आला कुठून? तो आहे कुठे? म्हणजे जर पृथ्वी बुडेल इतका जर समुद्र अस्तित्त्वात असेल तर तो आपल्याला सापडल्याशिवाय राहिला असता का?
  • जर देवाला भविष्यातलं कळतं, तर मग दानवांना वरदान देण्याच्या आधीच काळजी का नाही घेत? बरं एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, पण देवही अशा चुका सारख्याच करताना दिसतात. मग आपल्यसारख्या बापुड्या मनुष्यप्राण्याच्या हातातून चुका झाल्या तर त्यात नवल ते काय?
  • कृष्णाला खरंच अर्जुनाला भगवद्गीता समजावून सांगण्याइतका वेळ कुरुक्षेत्रावर मिळाला? तोवर बाकीचे लोक करत काय होते? मालिकेमधे दाखवताना सोयीसाठी म्हणून मागचे सगळे लोक ’pause’ status मधे दाखवतात. प्रत्यक्षात असं थोडंच असेल?
हे आणि असे बरेच प्रश्न मला सारखेच पडत असतात. आणि मला खात्री आहे की असे प्रश्न पडणारी मी एकटीच नक्कीच नाहीये. उत्तरं शोधायची सध्यातरी मला घाई अजिबात नाही. जोवर त्या उत्तरांवाचून काही अडत नाही तोवर चाललय ते चालू देत हेच माझं धोरण आहे. पण तुमच्याकडे उत्तरं असली तर जाणून घ्यायला नक्की आवडतील. आणि असे अजून प्रश्नही!

P. S. कृपया हा लेख वाचून माझ्या आस्तिकते/नास्तिकते बद्दल शंका काढू नका. जे मनात आहे ते मांडलंय इतकंच. अर्थात १००% आस्तीक माणूसही या शंकांचे योग्य प्रकारे निरसन करु शकेल की नही याबद्दल माझ्या मनात शंकाच आहे.