Tuesday, February 21, 2012

असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. आपण जसं पाहतो, जे पाहतो त्यात आपल्या मनाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. आपलं आनंदी असणं, दुःखी असणं हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात प्रतिबिंबित होत असतं. तर कधीकधी आजूबाजूच्या वातावरणाने आपला मन प्रसन्न होतं. आपला मूड आणि आजूबाजूचं वातावरण याच्यापैकी कुणाचा कुणावर जास्त प्रभाव पडतो, हे अधोरेखित करणं खरोखर अवघड आहे. किंबहुना यातली सीमारेषा अतिशय धूसर आहे.


काही लोकाना प्रत्येक गोष्टीत काहीतरी खोच काढायची सवय असते, तर काहीना अगदी वाईटातूनही चांगला काहीतरी शोधता येतं. अशा लोकांच्या संपर्कात येणारी व्यक्तीही आपोआप प्रसन्न होऊन जाते.


ज्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे अशी माणसं जगात आहेतच. पण प्रत्येक माणसाचं व्यक्त होणं ते खूप वेगवेगळं असतं. काहींना सहज सोप्या भाषेत म्हणणं मांडण्याची कला अवगत असते, तर काहींना अतिशय जड शब्द, अवघड शब्द नेमकेपणाने वापरता येतात. ( ग्रेसांची कविता हे याचं उत्तम उदाहरण आहे.. माझ्यासारख्या व्यक्तीला अनेकदा वाचून त्यातलं अवाक्षरही झेपत नाही ही गोष्ट वेगळी! मी आपली लोक म्हणतात ते खरच ग्रेट आहेत तर बुवा आहेत या चालीवर म्हणतेय!)
साधी सोपी मांडणी मात्र मनाला लगेच भावून जाते. व. पु. कुठे तरी म्हणून गेले आहेत, की लिखाण कसं असावं; तर जे वाचल्यावर, अरेच्चा! हे आपल्याला का नाही सुचलं बुवा, असं वाटायला लावणारं कुठलंही लिखाण.

आणि अशा सहज शब्दात जर आपल्या आयुष्याचा महोत्सव जर कुणी मांडून ठेवला, तर??


प्रति एक झाडा, माडा त्याची त्याची रूपकळा
प्रति एक पाना, फुला त्याचा त्याचा तोंडावळा

असो पाखरू, मासोळी, जीव, जीवार, मुंगळी
प्रत्येकाची तेवठेव काही आगळीवेगळी

असो ढग, असो नग, त्याची अद्रुत रेखणी
जी जी उगवे चांदणी तिच्या परीने देखणी

उठे फुटे जी जी लाट तिचा अपूर्वच थाट
फुटे मिटे जी जी वाट तिचा अद्वितीय घाट

भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे! अपुली चाले यातूनच यात्रा   


आपल्या आजूबाजूचं विश्व सहज शब्दात मांडणारे शब्द! कवी बा भ बोरकर यांनी लिहिलेली ही एक कविता. कुठली व्यक्ती जगाकडे कशी बघत असेल बरं असा प्रश्न पडता पडताच असं काही वाचण्यात येतं.
वाचल्यानंतर आपोआपच हा सोहळा आपणही अनुभवू लागतो.

Hats off to Borkar!!
(Thanks AM for sharing this :-))

Wednesday, February 8, 2012

किंमत

नवीन वर्षातला एक महिना बघता बघता उलटून गेला. दुसऱ्या महिन्याचा दुसरा आठवडाही सुरु झाला.
म्हटलं तर बराच काळ म्हटलं तर एक-दीड तर महिना. काळाची गती इतकी तुफान आहे की जणूकाही पापण्या लवायच्या आत दुनिया प्रचंड बदलेल इतकी प्रचंड गती जाणवते कधीकधी. होत्याचं नव्हतं व्हायला तसं म्हटलं तर एक क्षणही पुरेसा असतो. मग एक आठवडा काय चीज आहे!



माणसं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग. आपल्या आजूबाजूला असतातच सदैव. त्यात काय? पण त्याचं महत्त्व, त्यांच्या अस्तित्वाचा तुमच्या आयुष्याशी जोडलेला धागा कुठलीतरी परिस्थिती आल्यावर प्रखरपणे जाणवून देण्याची सोय निसर्ग आपोआपच करीत असतो. तुमच्या ध्यानीमनी नसताना तुमच्यावर सदैव कुणावरतरी विसंबून राहण्याची वेळ येते. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यासाठी चोवीस तास कुठल्या न कुठल्या प्रकारे त्यांची स्वतःची कामे बाजूला सारून धावत पळत असतात.  तेही विनातक्रार. चेहऱ्यावरती कसलाही थकवा जाणवू न देता. घरापासून आपण हजार किलोमीटर लांब असलो तरीही निश्चिंत आहोत. ही भावना केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे मनात असते. रक्ताची नाती तर असतातच, पण मनाची नाती बांधली गेली तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण असलो तरी एकटे नाहीयोत ही भावना खूप सुखावून जाते.

गेल्या महिन्यातलं माझं आजारपण या सगळ्या लोकांची किंमत मला शिकवून गेलं.  या सगळ्यांसाठी धन्यवाद हा शब्द खूप वरवरचा, त्रोटक आणि कोरडा वाटतो. 'Thank you' हा शब्द आजकाल इतक्या सर्रासपणे रोजच्या वापरत असतो की आताशा त्यातला खरा रस निघून गेल्यासारखाच वाटतोय. असो. इतकंच म्हणेन की सगळ्यांनी माझ्यासाठी जे केलं त्याचा विसर मला कधीच न पडो.




आपण आपल्या शरीराला तसं नेहमीच गृहीत धरत असतो. कधी कल्पना नाही करवत की एखादा अवयव जर निकामी झाला तर किती अडचणींचा सामना करावा लागेल. इतकं कशाला, साध्या आपल्या हाताच्या एका म्हटलं तर क्षुल्लक, अशा शिरेने जर असहकार पुकारला तर किती वाट लागू शकते याचाही प्रत्यय मला नुकताच आला. सलाईन दिल्यानंतर जेव्हा ती शीर सुजली आणि हात हलवताना नाकी नऊ येऊ लागले तेव्हा जो झटका बसला तो बसला.किंमत कळते ती अशीही.



आपण बऱ्याचदा इतक्या वेगळ्या विश्वात वावरत असतो की मृत्यू हे अंतिम सत्य आहे वगैरे वगैरे तत्वज्ञान खरं आहे हेच विसरायला होतं. जाणवतही नाही की आज आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय, हसतोय, गप्पा मारतोय तो कदाचित् काही दिवसांतच या जगातून जाणार आहे. जाणवेल तरी का? आणि कशाला? पण तरीही चुटपुट लागून राहते. बातमी ऐकल्यावर विश्वास बसत नाही. हीच का ती व्यक्ती? गेल्याच तर रविवारी
आपण भेटलेलो. गप्पा मारल्या. कितीतरी गोष्टी ठरवल्या. आणि आज ऐकतोय की ती या जगातून गेली! अचानकच! संपले म्हणे तिचे या जगात घ्यायचे श्वास. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्माला येतानाच हे ठरलेल असतं. काहीही. पण वाट्टेल तेव्हढा त्रागा करा, चीडचीड करा, रागराग करा.. शेवटी आपल्या हातात काहीच नाही. भांडायचं तरी कुणाशी? देव अस्तित्त्वात आहे का नक्की ? जाऊन भांडता तरी येइल! ही काय पद्धत आहे का माणसाला उचलायची? जाऊ देत. आपण जाऊच द्यायचं. आणखी करणार तरी काय म्हणा.
व्यक्ती गेली की मग एक एक गोष्ट आठवत राहते. अरेच्चा हे तर सांगायचच राहून गेलं, पुन्हा एकदा मुदुमलाईला बोलवायचं राहून गेलं. कसले प्लान्स आणि काय.
LIFE IS SOMETHING THAT HAPPENS TO YOU WHILE YOU ARE BUSY MAKING OTHER PLANS. हेच खरं.
असेही झटके मिळतात. किंमत कळते ती अशीसुद्धा!




नवीन नाती सतत जोडली जात राहतात. आपण खुशीत असतो की वाह, क्या बात है! आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याबरोबर आपली इतकी माणसं आहेत. भाग्यवान असतो आपण हे नक्की. पण ते भाग्य कदाचित आधीच्या माणसांच्या दुरावण्याशी जोडलेलं असतं कदाचित.