Tuesday, May 19, 2015

एका वेदनेची अखेर

अरुणा शानभाग. खरं तर हे नाव माझ्या जास्त परिचयाचं असण्याचं काही कारण नाही. तिचं अस्तित्व माझ्यासाठी एका वर्तमानपत्रातल्या बातमीपुरतं मर्यादित आहे, किंवा आता होतं म्हणावं लागेल. तिच्या आयुष्यावर बेतलेली 'अरुणाज स्टोरी' मी वाचलेलं नाही. माझा जन्म झाला तेव्हा तिच्यावर बलात्कार होण्याच्या घटनेला एक तप उलटून गेलं होतं. आयुष्यातल्या ६५ वर्षांपैकी तब्बल ४२ वर्षे कोमा मध्ये गेलेल्या अरुणा ची मृत्यूने अखेर सुटका केली. तिचं जाणं मनाला चटका लावून तर गेलंच, पण त्याबरोबर कितीतरी प्रश्नांचं काहूर माझ्यापाशी ठेवून गेलं. स्वतः न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा किती भोगावी लागावी याला काही मर्यादा आहे? दयामरणाचा हक्क असणे बरोबर की चूक याबद्दल विचार करणारी मी कोण? पण रोज तीळ तीळ मरण्यापेक्षा, एकदाच काय ते मरण येऊन गेलेलं बरं का नाही? असा विचार नक्कीच मनात खुपत रहातो. आज तिच्या कायदेशीर मृत्यूची बातमी वाचताना 'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'  हे सुरेश भटांचे शब्द या परिस्थितीत किती चपखल बसतात हे जाणवत होतं.

ई सकाळ वर ही बातमी वाचताना सहज वरच्या कोपरयाकडे लक्ष गेलं. '41 likes and 314 dislikes'.
मी कुठे क्लिक करावं?  कुणाच्याही निधनाच्या बातमीला 'Like' कसं करणार म्हणून 'Dislike';  की एका तडफडत्या आत्म्याची अखेर सुटका झाल्याचं बरं वाटलं म्हणून  'Like'?

मला उत्तर अजून सापडलं नाहीये.