Tuesday, February 10, 2015

हे असं असतं होय!

बऱ्याचदा आपल्यासमोर आलेल्या गोष्टी आपण फारसा विचार न करता गृहीत धरतो. किंवा आपल्याला कोणीतरी सांगितली आहे म्हणजे तशीच असली पाहिजे असा विचार करून शांतपणे स्वीकारतो. बऱ्याच काळानंतर अचानकपणे साक्षात्कार होऊन त्या गोष्टीचा खरं अर्थ उमगतो किंवा ती गोष्ट खऱ्या स्वरुपात आपल्या समोर येते. रियालिटी आपल्या डोक्यातल्या फ्यांटसीजला छेदून जाते आणि एखादी गोष्ट नव्याने उमजते तेव्हा म्हणावसं वाटतं, ओहो.. हे असं असतं होय!

 शाळेत असताना निबंधलेखन हा एक अत्यंत कंटाळवाणा पण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग असायचा. विषयही फारसे वेगवेगळे नसायचे. 'विज्ञान शाप की वरदान' किंवा 'माझा आवडता लेखक' किंवा 'माझी आई' इत्यादी. पण निबंधलेखन हे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी पाहून अनुभवून आपली विचार मते किंवा निरीक्षणे मांडण्याची गोष्ट आहे हे कोणीही सांगितलं नाही. बऱ्याचदा नवनीत चे गाईड्स आणि निबंधामालेसारखी (हातवळणे इ.इ.) रेफरन्स पुस्तके वाचून त्यातील छापील आराखड्यानुसार लिहिले जायचे.  माझी एक मैत्रीण नेहेमी म्हणते, की निबंधाच्या पुस्तकातली आई ही ऑफिसला जाणारी, मुलांचा गृहपाठ घेणारी अशी असते. त्यामुळे तिला नेहेमी असं वाटायचं की अशाच आई वरती निबंध लिहिणं अपेक्षित आहे. तिची आई लवकर उठून भाकऱ्या करणारी, शेतात जाणारी होती. तिच्याहीबद्दल लिहिता येऊ शकतं हे त्यावेळी कोणीतरी सांगायला तर हवं ना! शाळा सोडल्यानंतर बऱ्याच वर्षांनी हे कळलं की हे असं असतं तर!


परवा मी ALDI चं weekly offers booklet चाळत असताना मला एक गोष्ट दिसली. ' Hot Cross Buns' च चित्र होतं ते. त्यावरच्या डिस्काउंट ची माहिती दिली होती. शाळेत असताना 'hot cross buns, hot cross buns, one a penny, two a penny, hot cross buns' अशी एक कविता होती. त्यातले ते buns म्हणजे हेच (त्यावर खरंच क्रीम ने भरलेला क्रॉस असतो! असं असू शकेल असा विचार त्यावेळी कविता शिकताना अजिबात केला नव्हता). ते असे असतात/दिसतात हे आत्ता इतक्या वर्षानंतर समजलं तेव्हा खरच मजा वाटली. असा मी असामी मधल्या शंकऱ्या "म्हणजे तुम्ही मला डुक्कर म्हणता ते हे होय!" असं म्हणतो त्यातली गत :)