Tuesday, April 20, 2010

again.. time has come.
time to go back..

Somehow,I don't feel like I have spent more than 3 months(continuously) here.
Just few days have passed. Till few days ago I was trying to get used to Bangalore routine and now that I am used to it, time has come to move once again...

I am feeling lazy to pack everything up once again, to travel.
But I think this is always the case with me.
I remember the day I was traveling Pune-Bangalore for the first time in my life.
I remember the day I was traveling Bangalore-Mudumalai for the first time.
This was the same feeling that time also.

But why now?
Now the situation is all different. I know where I am going. I know that place, I know people there. I like to be there.

But still, I don't want to go there. Why?
Have I become too rigid?

Friday, April 16, 2010

आज मी अतिशय आनंदी आहे आणि थोडीशी दुःखी सुद्धा. आज आमचा कोर्स संपला. गेले ४ महिने कसे गेले ते कळले नाही. बहुतांशी भाग आधीच शिकले होते. तरीही एका नवीन approach ने शिकता आलं. वेगळ्या पद्धतीने विचार केला गेला.. आणि हो, fourier analysis पण काही अंशी शिकले. एखादी गोष्ट स्वतः होऊन शिकायची आहे, इंटरेस्ट आहे म्हणून शिकणं आणि कम्पल्सरी असल्यामुळे शिकणं किती वेगळं असतं.. आतापर्यंत मी शिकले, courses attend केले, कारण ते compulsory होते.. आणि या वेळी मी शिकले कारण मला ते शिकायचं होतं, स्वतःची इच्छा होती ... That makes difference !!

आतापर्यंत टर्म संपली की खूप आनंद व्हायचा.. चला, एकदाचं संपलं.. असं वाटायचं..
आजही वाटतंय, नाही असं नाही. (उगाच खोटं कशाला बोला?) . पण फरक इतकाच आहे की तितकंच वाईट पण वाटतंय. आज असं वाटतच नव्हतं की ते lecture संपावं.. अजून शिकवा, अजून शिकवा, असं मनात सारखं ओरडत होते (सरांना उद्देशून!). पण काय करणार? आम्ही नंतर गेलो सुद्धा सांगायला, की extra lectures घेऊन एक दुसरा topic पण cover करा म्हणून.. पण त्यांनी ऐकलं नाही... म्हणून थोडं जास्त वाईट वाटतंय...अर्थात बाकी कुणालाच इंटरेस्ट नव्हता आणि professor ना सुद्धा ...भरीस भर म्हणजे मी हा course audit करत असल्यामुळे professor ने मला तुम्हाला exam द्यावीशी वाटतेय का? द्यायची असेल तर द्या.. असे म्हटले .. एरव्ही काय मस्त वाटलं असतं.. जर exam द्यावी की नाही हा निर्णय जर माझ्यावर सोडला असता तर.. पण आज नाही वाटलं. वाटलं, या विषयाचा अभ्यास मी जर कम्पल्सरी असता तर चांगल्या प्रकारे केला असता.

जाऊ देत. पण थोडं काहीतरी शिकले आहे हे काय कमी आहे?

Tuesday, April 13, 2010

हे जीवन सुंदर आहे...

गेले काही दिवस मी बऱ्यापैकी 'अवचट' मय होऊन गेले आहे.याआधी प्रकाश नारायण संत, शिवाजी सावंत, व पु, पु. ल. आणि असेच कितीतरी लोक वाचताना अशीच हरवून गेले होते. एखाद्याच्या लिखाणाने भारावून गेले आहे अशी अवस्था खूप दिवसांनी अनुभवायला मिळाली.
व.पु. नी कुठेतरी म्हटलंय, की श्रेष्ठ लिखाण कोणतं? तर जे इतकं सहज आहे की अरेच्चा, हे आपल्याला का नाही सुचलं बुवा? असं वाटायला लागेल असं कोणतंही लिखाण.
अवचट वाचताना असंच क्षणोक्षणी जाणवत. 'जगणं' म्हणजे काय हे कळून घ्यायचं असेल तर अवचटांच कुठलही पुस्तक वाचावं. काही दिवसांपूर्वी माझ्या हातात त्यांच 'स्वतःविषयी' हे पुस्तक आल. ते झपाट्यानं वाचून काढलं. आणि त्यानंतर लगेचच त्यांचं 'सुनंदाला आठवताना' हेही मिळालं. खर तर सध्या परीक्षा, submissions आणि presentation यांची टांगती तलवार डोक्यावर आहे. तरीही काल 'सुनंदाला आठवताना' वाचायला सुरुवात केली आणि ते संपवूनच थांबले.
एक विलक्षण अनुभव होता तो. सहजीवन कसं असावं, याचा जणू काही आदर्शच. त्याचबरोबर भारावून जायला झालं ते सुनंदा अवचट यांच्याबद्दल जाणून घेतल्यामुळे. संपूर्ण लेख म्हणजे एक आरसा आहे, सुनंदा अवचट या व्यक्तिमत्त्वाचा. नकळत मन तुलना करू लागलं.त्यांचा शिस्तशीरपणा, नेटकेपणा, कामाचा उरक, सगळंच 'perfectionist ' या शिक्क्याला साजेसं. वाटत होतं, अरे, आपण यातलं निम्मं जरी उचलू शकलो तरी आपली किती प्रगती होईल.
वाढदिवसाचं present म्हणून आपल्यामधला एखादा दुर्गुण कमी करणे ही किती मोठी गोष्ट आहे! अवचट म्हणतात, नंतर नंतर एकमेकांमधल्या खटकणाऱ्या गोष्टीच संपल्या!! किती सहज म्हणून जातात ते हे. 'स्वतःविषयी' या पुस्तकात बऱ्याचदा असा उल्लेख आला आहे की, सुनंदा आणि अनिल यांच्या लग्नाला अवचटांच्या घरून विरोध होता.आणि या लेखात तर पदोपदी असा उल्लेख आला आहे की अवचटांचे आई-वडील आणि इतर नातेवाईक यांच्याशी सुनंदा अवचटांनी किती चांगले संबंध जोपासले होते.खरच एखादा माणूस आपल्या वागण्याने अशी सगळ्यांची मने जिंकून घेऊ शकतो?
त्यांच्या रुग्णांशी वागणुकीचे तर कितीतरी दाखले वाचताना जाणवतात. आपुलकी, जिव्हाळा, एखाद्याच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा केलेलं कौतुक समोरच्या माणसाला उभारी द्यायला पुरेसा पडतो हे त्यांनी जणूकाही सिद्धच केलं. मुक्तांगण बद्दल वाचताना तर थक्कच झाले. माणसांच्या मनातल ओळखण्याची जादू होती की काय त्यांच्याकडे? कसा जमत असेल ते सगळं?
सर्वात जास्त वाईट वाटले ते त्यांच्या कॅन्सर निदानाबद्दल वाचताना. इतका positive approch आयुष्याबद्दल माणसाजवळ असू शकतो? कसं काय? कॅन्सरच्या निदानानंतर त्या आठ वर्षे जगल्या. अवचट म्हणतात, 'ती आठ वर्षे ऐंशी वर्षांपेक्षा मोठी. आम्ही कधी नव्हतो, एव्हढे जवळ आलो, समरसून जगलो. या आजारानं वेळेची किंमत कळाली. '
पेशंटनीच डॉक्टरला धीर दिल्याचं कुणी कधी ऐकलय का? त्यांच्या बाबतीत तर अजबच, आपण स्वतः केमो साठी admit असताना दुसऱ्या पेशंटच counselling करणं त्याच जाणोत.
शेवटी काय, असलेल आयुष्य पूर्णपणे भरभरून जगणं यापेक्षा चांगलं काय? सुनंदा आणि अनिल अवचट यांच्याबद्दल वाचताना हेच जाणवत. प्रवीण दवणेंच्या भाषेत 'जगण्याचा सोहळा' साजरा करीत असलेली माणसे ही.. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? त्यांच्यासारखं भरभरून जगायला आवडेल हे मात्र खर..

Monday, April 5, 2010

nostalgia..

आज सहजच जुने फोटो बघत बसले होते. आणि अचानकच हाती आला एक अल्बम (सॉरी, फोल्डर!).
डिसेंबर '०९ च्या पहिल्या आठवड्यात एका आदिवासी शाळेत जायची संधी मिळाली होती.
ANCF म्हणजे Asian Natural conservation foundation यांच्यातर्फे एक उपक्रम राबवला जातो. बरेचसे स्वयंसेवक वेगवेगळ्या आदिवासी शाळेत जाऊन
वेगवेगळे विषय (बहुतेक करून शास्त्र निगडीत) शिकवतात. पर्यावरणशास्त्र हा त्यातला मुख्य भाग असतो.
कारण बहुधा या सगळ्या शाळा अगदी छोट्याशा खेडेगावातल्या आहेत. इथे येणारी जवळपास सगळी मुलं कुठल्या ना कुठल्या आदिवासी जमातीतली आहेत.
त्यामुळेच निसर्ग हा त्यांच्या आयुष्यातला बराच मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे.

असेच त्या वेळी गीता field station वर आली होती. ती दोन दिवस तिकडे राहणार होती. २-३ शाळात जाऊन चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्याचं तिने ठरवलं होतं. त्यासाठी तिने बरीच बक्षिसे ही आणली होती मुलांना वाटण्यासाठी. वेळ होतं त्यामुळे मी तिला सहजच म्हटलं की मी आले तर चालेल का? मला खूप आवडेल या मध्ये सहभागी व्हायला. तिने लगेचच संमती दिली.

बोक्कापुरम ते उटी रस्त्यावर बोक्कापुरम पासून ३-४ kilometer वर मावनहल्ला म्हणून एक अतिशय छोटं आणि मस्त गाव आहे. तिकडे जायचं ठरलं होतं.
स्पर्धेसाठी मुख्यतः तीन गट केले होते. अगदी छोटे म्हणजे बालवाडी ते दुसरी, मध्यम म्हणजे तिसरी ते पाचवी-सहावी आणि मोठा म्हणजे नववी दहावीपर्यंत.
छोटा गट आणि मध्यम गटासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली तर मोठ्या गटासाठी निबंध.

आम्ही गेलो तेव्हा तिथल्या शिक्षक शिक्षिका आपापल्या वर्गांवर शिकवत होते. आम्ही गेल्यावर मात्र आमच्यासाठी खास वेळ देण्यात आला.

ही शाळा मला अतिशय मनापासून आवडली. एक तर खूप वर्षांनी शाळेत पाऊल टाकत होते. त्यामुळे माझी शाळा, शाळेतले दिवस, बेंचेस, युनिफॉर्म वगैरे खूप आठवत होतं. जणूकाही मी स्वतःलाच त्या मुलांच्या ठिकाणी परत पाहत होते.
बालवाडी, पहिली दुसरी या तिन्ही वर्गांसाठी एकाच शिक्षिका होत्या. तीच गट जराशा मोठ्या चौथी पाचवीच्या वर्गांसाठी. कारण इथल्या विद्यार्थ्यांची संख्या तशी बरीच कमी आहे. जरी विध्यार्थ्याने नाव शाळेत घातले असले तरी तो शाळेत येईलच नियमितपणे याची खात्री अजिबात नाही. कारण मुळातच अभ्यासाची गरज त्यांना फारशी जाणवत नसावी. आम्ही गेलो तेव्हा तिथले एक शिक्षक एका विद्यार्थ्याची चौकशी दुसऱ्या मुलांकडे करत होते (अर्थातच तमिळ मधून!!) तो मुलगा बरेच दिवस शाळेत आला नसावा. ते शिक्षक ज्या तळमळीनं मुलांना शाळेत या म्हणून सांगत होते ते बघून खूप भरून आलं. खरच किती अवघड आहे अशी मुलं सांभाळणं..जरीही ते तमिळ मधून बोलत असले तरी त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांच्या आविर्भावावरून लगेचच कळत होतं. खरच खूप dedicated शिक्षकच हवेत अशा ठिकाणी.

आम्ही चित्रकला आणि निबंध स्पर्धा त्या मुलांना विषय देऊन सुरु केली. तसा विषय असा काहीच दिला नव्हता. चित्रकलेसाठी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जे आवडेल, तुमच्या मनात जे चित्र असेल ते काढा. इथे एक खूप छान आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे जेव्हढी मुले चित्र काढत होती त्यापैकी जवळपास सर्व..म्हणजे दोन तीन सोडल्यास, सर्व मुलांच्या चित्रांचे विषय निसर्गाशी संबंधित होते. म्हणजे अगदी हरीण, सांबर, हत्ती, मोर आणि पक्षी वगैरे सुद्धा या मुलांनी अतिशय सहजतेने आणि सुंदर काढले होते. मुळातच त्यांची निरीक्षणशक्ती किती जबरदस्त होती हे लगेचच कळून येत होतं. हरीण, सांबर किंवा मोर काढताना shape , size यांचा जे आकलन होतं ते खरोखर शब्दात नाही मांडू शकत मी इथे. त्याचवेळेला मला सकाळ मध्ये दर रविवारी बालवाचकांची जी चित्रे प्रसिद्ध होतात ती आठवली. नव्वद ते पंच्याण्णव टक्के विषय कार्टून किंवा animation किंवा तत्सम असतात. यावरून मी विचार करत होते की मुलांना जे अवतीभवती दिसत त्याप्रमाणे विचार करायची किंवा वागायची सवय लागते. निसर्गाच्या सानिध्याच महत्त्व मला खरच तिथे पटत होतं.

हे सगळं होत असताना आम्ही त्या सगळ्या वर्गातून फिरत होतो. पहिल्यांदा आम्ही वर्गात गेलो तेव्हा तिथल्या बाईंनी त्या मुलांना उभ राहायला लावून आम्हाला 'good morning madam' म्हणायला लावलं होतं. खूप awkward feel झालं तेव्हा. हे transition कधी झालं आणि मी 'madam' कधी झाले हे मलाही कळलं नाही. आणि नंतर जेव्हा जेव्हा मी त्या वर्गात चक्कर टाकली तेव्हा तेव्हा ती छोटी चिल्लीपिल्ली हातातल काम टाकून मला 'good morning madam ' म्हणत होती. त्यात मलाही मजा आली आणि बहुधा त्यानाही मजा वाटत असावी. मधल्या वेळेत मी त्यांची नावं विचारण्याचा प्रयत्न केला. आता ती नावं लक्षात नाहीत पण एकीचं नाव 'रोजा' होतं हे चांगलाच आठवत. (फिल्म effect होता की काय असा विचार माझ्या मनाला सहजच शिवून गेला!) निबंध स्पर्धाही बऱ्यापैकी चांगली झाली. काही मुलांनी भरभरून लिहिलं तर काहींनी अगदी जबरदस्ती केल्यासारखं चार ओळी खरडून दिल्या होत्या. तमिळ असल्यामुळे अर्थातच तिथेही काहीच scope नव्हता मला.. पण एकंदरीत हस्ताक्षर आणि नीटनेटकेपणा यावरून मी अंदाज बंधू शकत होते की कुणी बरा लिहिला असावा.

स्पर्धा सुरु असताना मी सहजच तिथल्या एका शिक्षकांशीही बोलले. त्यांनी सांगितला की त्या मुलांना जनरली एक शैक्षणिक वर्ष संपवायला दीड कॅलेंडर year लागतात. त्या शिक्षकांना इंग्रजी आणि तमिळ याशिवाय कुठलीच भाषा येत नव्हती. त्यामुळे मला माझी मातृभाषा म्हणजे मराठी आणि इंग्रजी सोडून हिंदी पण येत याच फार अप्रूप वाटत होतं. त्यांच्या विनंतीवरून मी त्यांचं नाव हिंदीत पण लिहून दाखवलं. कदाचित त्यांनी अजूनही तो त्यांचं नाव लिहिलेला चीठोरा जपून ठेवला असेल.

चित्रकलेचा निकाल लावणं खरोखर आम्हाला खूप अवघड गेलं. आम्ही तिथल्या मुख्याध्यापिकेला विनंती केली की तुम्ही आम्हाला निकाल ठरवण्यासाठी मदत करा. पण त्यांच्या मते त्यांना सगळी मुले माहित होती त्यामुळे त्यांनी लावलेला निकाल biased होऊ शकला असता. त्यानुळे त्यांनी नकार दिला. शेवटी मी, गीता आणि शक्ती अशा तिघांनी मिळून prize winners ठरवले.

बक्षीस समारंभ दुसऱ्या दिवशी असल्या कारणाने मी जाऊ शकले नाही. पण तो दिवस माझ्यासाठी खूप संस्मरणीय ठरला. मला तमिळ येत नाही याचा सगळ्यात जास्त वाईट त्या दिवशी मला तिथे वाटलं. कारण इतक्या छान छोट्या मुलांशी मी काही निवडक इंग्रजी शब्दांव्यतिरिक्त काहीच बोलू शकले नाही.

पण हा अनुभव एकंदरीतच इतका मस्त होता की मी पुन्हा तिथे जायचच असं ठरवूनच परत आले. आता बघूयात परत केव्हा संधी मिळते ते!!

Friday, April 2, 2010

विस्तार

कधी कधी खरच आश्चर्य वाटतं... अचंबित व्हायला होतं...
खरंच, अगदी लहान असताना माझ्या विश्वात आई,बाबा, दादा यांच्याशिवाय कुणीच नव्हतं.
हळूहळू त्यात शाळा, शाळेतल्या मैत्रिणी, शिक्षक सामील झाले..
नंतर कॉलेज, क्लास, इतर आजूबाजूचे ओळखीचे लोक आले.

कॉलेजला गेल्यानंतर कुणी शाळेतलं भेटलं की अतिशय आनंद व्हायचा.
युनिव्हर्सिटीमध्ये पाऊल टाकल्यावर कुणी आपल्या कॉलेजच भेटलं म्हणजे खूप बरं वाटायचं.

आणि आता, आता घराच्या बाहेर पडले आहे, पुण्याच्या बाहेर पडले आहे.
बंगलोरला आल्यावर अगदी सुरुवातीच्या काळात कुणीही मराठी आणि त्यातून पुण्याचं कुणी भेटलं की किती आनंद व्हायचा म्हणून सांगू .

इथे आल्यावर खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली, वेगवेगळ्या स्तरातली, वेगवेगळ्या ठिकाणची माणसं भेटली..अजूनही भेटताहेत.
आता कुणीही महाराष्ट्रीय माणूस भेटलं तरी आपुलकी वाटते. IISC च्या campus मधून बाहेर पडलं आणि IISC तला जरी कुणी दिसलं तरी
'अरे, हा/ ही तर IISC तली दिसतेय' असा सहजच विचार शिवून जातो.

मुदुमलाईला गेल्यापासून तिथले लोक, तिथले आदिवासी, आमच्या इथे काम करणारी माणस यांच्याशी एक आपुलकीच नात निर्माण झालं.
मध्ये पुण्याला गेले होते तेव्हा अचानकच मला एक जोडपं दक्षिणी भाषेत बोलताहेत असं जाणवलं.. आणि का काय माहीत, त्यांच्याशी जाऊन बोलावं, त्यांच्याशी ओळख करून घ्यावी अशी इच्छा झाली.. अर्थात त्यांना त्याचा पत्ताही नसेल..
आणि माझं मलाच हसायला आलं. किती सहज बदलले आहे मी.

कधीतरी मी माझ्या शाळेची होते..
नंतर कॉलेजची झाले.. नंतर युनिव्हर्सिटीची..
हळूहळू पुण्याची ...महाराष्ट्राची झाले...

कदाचित काही वर्षांनी कुठेतरी माझीच ओळख मला मी भारतीय आहे म्हणूनही करून द्यावी लागेल..

एकंदरीत काय, माझं क्षितीज रुंदावतय ..
माझं विश्व विस्तारत जातंय.. माझ्याच नकळत...