Friday, August 19, 2011

कोलाज

तो निळाशार..
आकाशाचा आरसा
आकाश आपली निळाई न्याहाळत हसत असलेलं जणू

तो अथांग..अपार..
दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत पसरलेला..किंबहुना त्याच्याही पलीकडे
मर्यादा तर होत्या माझ्याच नजरेला

समोरचं क्षितीज..
आकाश आणि धरणीला विलग करणारं एक धूसर सत्य
अन्‌ तेच क्षितीज..
जणू एक मृगजळ
मी एक पाऊल पुढे टाकलं की तेही टाकी एक हळूच मागे
त्याला कवेत घेण्याचं माझं स्वप्न शेवटी अपुरंच

तो किनारा..
चहूबाजूंनी पाण्याने वेढले जाण्याची उगा दाटलेली अनामिक भीती
फोल असल्याची जाणीव करुन देणारा
मला माझ्या परिचित जगाशी-जमिनीशी जोडून ठेवणारा दुवा

तो धीरगंभीर..
त्याच्या ह्र्दयातून उत्पन्न होणार्‍या लाटा मात्र अवखळ..चंचल
हसत हसत किनार्‍याकडे धाव घेणार्‍या
जितक्या आतुर सामावून जाण्यास
तितक्याच सामावून घेण्यासही..
किनार्‍यावरच्या वाळूशी त्यांचा चाललेला पाठशिवणीचा खेळ
माझ्या पावलांना स्पर्श-सुखावून जात होता

मी किनार्‍यावर..तो समोर..
वरवर भासत होता शांत..स्थिरचित्त
कोट्यावधी जीवांचं घर त्याच्यामधे दडलंय
माझ्या जाणीवेपलिकडचं एक प्रचंड विश्व त्याच्या पोटात नांदतय
लाटांसमवेत किनार्‍यावर येउन पहुडणारे शंख-शिंपले, खेकडे
त्यांच्या अस्तित्त्वाची झलक दाखवून देत होते

दिवस हळूहळू कलू लागला
पौर्णिमेच्या दिवशी जरा लाटांना उत्साहाचं उधाणंच येतं जणू
सुरुवातीची त्याची गाज मंद आवाजात मंत्रपठण केल्यासारखी
त्याचं केव्हा उच्च नामघोषाच्या लयीत-सुरात रुपांतर झालं ते समजलंही नाही

मी हलकेच माझे डोळे मिटून घेतले
बाहेरचा कोलाहल शांत झाला
बाहेरच्या जगापेक्षा वेगळं असं आणखी एक विश्व खुणावू लागलं
ऐकू येऊ लागला एक वेगळा नाद..अंतर्नाद
माझ्या मनातही एक अखंड दर्या सामावलेला आहे...!