Thursday, November 17, 2011


रविंद्रनाथ टागोर. या माणसाबद्दल बऱ्याच लोकांकडून बरंच काही ऐकलं होतं. या माणसाला, याच्या साहित्याला, लोक इतकं का मानतात, हे आतापर्यंत कधी कळलं नव्हतं. किंबहुना कळून घ्यावं अशी मनापासून कधी इच्छा झाली नव्हती. बंगाली साहित्य आणि रविन्द्रनाथ टागोर यांची नावं जोडीनंच घेतली जातात. इतरही अर्थातच कितीतरी साहित्यिक असतीलच; परंतु रविन्द्रनाथांना जे प्रेम, जो नावलौकिक लाभला तितका इतर कुणाला क्वचितच लाभला असेल.(आणि असल्यास केवळ माझ्या अज्ञानातून आलेलं वरील स्वगत आहे असं समजून घेण्यास हरकत नसावी).
पु. ल. देशपांडे हे मराठी साहित्यातलं अग्रगण्य नाव. बंगाली भाषा शिकण्यासाठी आणि नंतर रवीन्द्रनाथांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी ते खास बंगालला जाऊन राहिले होते हे ऐकल्यावर त्यांच्याविषयी वाटणारा आदर आणखी वाढला होता. त्यांच्या शान्तिनिकेतनाताल्या मुक्कामाताल्या अनुभवांवर आधारलेलं ‘मुक्काम शांतीनिकेतन’ हे पुस्तक काही दिवसांपूर्वी हातात पडलं. या पुस्तकात मुख्यतः पु लं च्या नजरेतून रविंद्रनाथ जाणवत राहतात. रवीन्द्रनाथांच्या साहित्यातले स्फुट उतारे, त्यांच्या कविता, काही पत्रे यांचा अनुवाद पु लं नी केलाय. अनुवादावर पु लं ची छाप जरी असली तरी रविंद्रनाथ या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे कंगोरे दिसत राहतात. विशेषतः निसर्गाशी जवळीक साधून राहिलेले ते निसर्गाविषयी आपलेपणा दाखवताना जगावं कसं; याबद्दल जाता जाता अत्यंत सोप्या भाषेत खूप काही शिकवून जात आहेत असं सतत जाणवत राहतं. एका वेगळ्याच दृष्टीकोनातून मग आपण आपल्या आयुष्याकडे पहायला लागतो. 

नाथांच्याच भाषेत सांगायचं तर:
...कोण मला काय बोललं, कोण मला काय समजलं, हे काय जगात सर्वांहून अधिक मोठं? माझ्या डोळ्यातली क्षणभराची दृष्टीशक्ती ही किती प्रचंड गोष्ट आहे! एक वेळ नुसता श्वासोच्छवास घेण्याची माझी शक्ती ही केव्हढी आश्चर्यकारक घटना! माझ्या मते, ह्या परम आश्चर्यकारक वस्तुस्थितीला कुठलंही दुःख मलीन करू शकणार नाही.
.. वाटतं जीवनातल्या प्रत्येक सूर्योदयाला ओळखीच्या नात्याने नमस्कार करायला हवा आणि प्रत्येक सूर्यास्ताला जिवलग मित्रासारखा निरोप द्यायला हवा. इतक्या सुंदर रात्री माझ्या जीवनातून रोज निघून चालल्या आहेत.-ह्या सगळ्या काही मी धरून ठेवू शकत नाही. हे सारे रंग, हा प्रकाश, ह्या छाया हा आकाशव्यापी निःशब्द महोत्सव, ही ध्युलोक आणि भूलोकाच्या मध्ये असलेली, सारं शून्य परिपूर्ण करणारी शांती आणि सौंदर्य ह्यांसाठी काय कमी पूर्वतयारी(आयोजन) चालली असेल? उत्सवाचं क्षेत्र केव्हढ विशाल? बाहेर एव्हढं आश्चर्यकांड चाललय आणि आमच्या आत मात्र ती हाक ऐकूही जाऊ नये. जगापासून इतकी फारकत घेऊन आम्ही जगतो आहो?  लक्ष लक्ष योजनांच्या अंतरावरून लक्ष लक्ष वर्षांपूर्वी अनंत अंधकाराच्या वाटेनं प्रवास करत एखाद्या तारकेचा प्रकाश ह्या पृथ्वीवर येऊन पोहोचतो आणि आमच्या अंतरात येऊन तो प्रवेश करू शकत नाही- जणू काय तो आणखीही लक्ष योजनं दूर! 


अस काही वाचलं की जाणवतं; की आपली दुःख, आपल्या समस्या आपण किती कवटाळून बसतो!  मी, माझं हे, माझं ते, मला यानं दुखावलं, इत्यादी इत्यादी अत्यंत छोट्या गोष्टीमध्ये गुरफटून जाताना आपण हे विसरूनच जातो की यापलीकडेही जग आहे. चार भिंतीत बंदिस्त किती सहजतेन करून घेतो स्वतःला आपण!


काल सहज रात्री आकाशाकडे नजर गेली आणि खरंच जाणवलं की हे लक्ष तारे लक्षावधी योजनांचा प्रवास करून आपल्याला भेटायला आले आहेत. तसे ते रोजच येतात; हसतमुखानं त्यांच स्वागत करायचं मात्र राहून जातं..