Friday, April 20, 2012

moving on

CHANGE IS THE ONLY CONSTANT THING IN THE WORLD.


बरोबर. नेहमीचं ऐकलं जातं हे वाक्य. पटतही. पण तरीही कुठलाही बदल स्वीकारणं तसं जरा अवघडच असतं, नाही का? बऱ्याचदा आश्चर्य वाटतं, इतकं का आपण आधीच्या गोष्टीत गुंतून पडलो आहोत? आपण आपल्या भावना गुंतवल्या असतात की तो नुसताच सवयीचा परिणाम असतो? की नवीन गोष्ट स्वीकारण्यातला आळस? की नवीन गोष्टीच्या अनभिज्ञतेतून नकळत निर्माण झालेली भीती? सतत काहीतरी हातातून निसटतंय याची नकळत बोच लागून राहते. हुरहूर असते की हे निसटतं आपल्याला कायम घट्ट नाही पकडून ठेवता येणार. पण एकीकडे हेही कळत असतं की काही गोष्टी हातातून जात आहेत हे खरं, पण काहीतरी नवीन नक्कीच आपल्या वाट्याला येईल जे चांगलंच असेल. आशा किती चिवट असते! 

बदलाला सामोरं जाताना मात्र खरंच गंमत येते.

अगदी सुरुवातीला अक्षरशः जाणवतं, आपलं मन हर प्रकारे -आताची स्थिती किती चांगली- बदल कसा वाईट, याची हजार कारणं शोधतं. पावला पावलावर पुरावे देत रहातं. तुलना करत राहतं. हळूहळू दुसरं मन पुढे येऊ लागतं. म्हणतं, आताची गोष्ट चांगली हे मान्य. पण नव्याने सामोरी येणारी गोष्ट ही वाटतं तितकी वाईट नाहीच. होईल की सवय. न जाणो तेव्हा अशा काही गोष्टी मिळतील की ज्याचा आधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. या दोन मनातली द्वंद्व आपण तिसऱ्याच तटस्थ भूमिकेतून पाहत राहतो. हळूहळू दुसऱ्या मनाची सरशी होतेय हे जाणवतं. हे तसं होणंच चांगलं अर्थातच. आपल्याच नकळत पहिलं मन दुसऱ्या मनाची कड घेऊ लागतं. द्वंद्व कमी कमी होऊ लागतं.
आणि मग आपल्यालाच एक दिवस कळतं, अरेच्चा नाही म्हणता म्हणता आपण बदल स्वीकारला. आपण बदललो.. आपल्याच नकळत....