धुके दाटलेले उदास उदास
मला वेढिती हे तुझे सर्व भास
उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन् फिरे आर्त वारा
कुणीही न येथे दिसे आसपास
कुठे चालल्या या दिशाहीन वाटा ?
कुणा शोधिती या उदासीन लाटा ?
दिशांतून दाटे तुझा एक ध्यास
क्षणी भास होतो तुझे सूर येती
जिवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास
उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन् फिरे आर्त वारा
कुणीही न येथे दिसे आसपास
कुठे चालल्या या दिशाहीन वाटा ?
कुणा शोधिती या उदासीन लाटा ?
दिशांतून दाटे तुझा एक ध्यास
क्षणी भास होतो तुझे सूर येती
जिवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास
- मंगेश पाडगावकर
दोन महिने उलटून गेलेत, मी तिचा आवाज ऐकला नाहीये. तिच्या मांडीवर डोकं टेकवून, तिचा हात माझ्या डोक्यावर फिरून तर न जाणो किती महिने झालेत. 'जातस्य हि ध्रुवो मृत्यु' वगैरे सगळं ऐका-वाचायला ठीक आहे. पचवणं फार कठीण! आतापर्यंत वाचनात आलेल्या, शाळेत शिकलेल्या सगळ्या कविता आता अनुभवाची जोड घेऊन समोर येताहेत. फ. मुं च्या भाषेतली 'जन्माची शिदोरी' माझी ती, सरणार जरी नसली तरी उरली नसल्याची बोच घेऊन जगणं थोडं अवघड आहे खरं. असो!
P.S.: वरची पाडगावकरांची कविता मूळ वेगळ्या context मध्ये असली तरी मला वाचताना वेगळा अर्थ सापडला. चू.भू.दे.घे.