Tuesday, February 21, 2012

असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. आपण जसं पाहतो, जे पाहतो त्यात आपल्या मनाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. आपलं आनंदी असणं, दुःखी असणं हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात प्रतिबिंबित होत असतं. तर कधीकधी आजूबाजूच्या वातावरणाने आपला मन प्रसन्न होतं. आपला मूड आणि आजूबाजूचं वातावरण याच्यापैकी कुणाचा कुणावर जास्त प्रभाव पडतो, हे अधोरेखित करणं खरोखर अवघड आहे. किंबहुना यातली सीमारेषा अतिशय धूसर आहे.


काही लोकाना प्रत्येक गोष्टीत काहीतरी खोच काढायची सवय असते, तर काहीना अगदी वाईटातूनही चांगला काहीतरी शोधता येतं. अशा लोकांच्या संपर्कात येणारी व्यक्तीही आपोआप प्रसन्न होऊन जाते.


ज्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे अशी माणसं जगात आहेतच. पण प्रत्येक माणसाचं व्यक्त होणं ते खूप वेगवेगळं असतं. काहींना सहज सोप्या भाषेत म्हणणं मांडण्याची कला अवगत असते, तर काहींना अतिशय जड शब्द, अवघड शब्द नेमकेपणाने वापरता येतात. ( ग्रेसांची कविता हे याचं उत्तम उदाहरण आहे.. माझ्यासारख्या व्यक्तीला अनेकदा वाचून त्यातलं अवाक्षरही झेपत नाही ही गोष्ट वेगळी! मी आपली लोक म्हणतात ते खरच ग्रेट आहेत तर बुवा आहेत या चालीवर म्हणतेय!)
साधी सोपी मांडणी मात्र मनाला लगेच भावून जाते. व. पु. कुठे तरी म्हणून गेले आहेत, की लिखाण कसं असावं; तर जे वाचल्यावर, अरेच्चा! हे आपल्याला का नाही सुचलं बुवा, असं वाटायला लावणारं कुठलंही लिखाण.

आणि अशा सहज शब्दात जर आपल्या आयुष्याचा महोत्सव जर कुणी मांडून ठेवला, तर??


प्रति एक झाडा, माडा त्याची त्याची रूपकळा
प्रति एक पाना, फुला त्याचा त्याचा तोंडावळा

असो पाखरू, मासोळी, जीव, जीवार, मुंगळी
प्रत्येकाची तेवठेव काही आगळीवेगळी

असो ढग, असो नग, त्याची अद्रुत रेखणी
जी जी उगवे चांदणी तिच्या परीने देखणी

उठे फुटे जी जी लाट तिचा अपूर्वच थाट
फुटे मिटे जी जी वाट तिचा अद्वितीय घाट

भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे! अपुली चाले यातूनच यात्रा   


आपल्या आजूबाजूचं विश्व सहज शब्दात मांडणारे शब्द! कवी बा भ बोरकर यांनी लिहिलेली ही एक कविता. कुठली व्यक्ती जगाकडे कशी बघत असेल बरं असा प्रश्न पडता पडताच असं काही वाचण्यात येतं.
वाचल्यानंतर आपोआपच हा सोहळा आपणही अनुभवू लागतो.

Hats off to Borkar!!
(Thanks AM for sharing this :-))

7 comments:

  1. Thanks for sharing the nice poem....

    ReplyDelete
  2. अतिशय आशयपूर्ण लिखाण आहे..
    मी तुझ्या मताशी एकदम सहमत आहे.. विचार तोच असतो पण प्रत्येकाची त्याच्याकडे बघण्याची आणि व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते..तीच माणसाला uniquness मिळवून देते..
    ही कविता खरंच खूप आवडली.. त्याला अर्थ आणि लय दोन्ही आहेत..वाचताना मनातल्या मनात चाल लागत जाते..
    हा ब्लोग म्हणजे मला आता वाचण्यासाठी अक्षरश: घबाड मिळालेय..तुझं लिखाण खरंच छान आहे keep it up....

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Vinayak.. glad to know you liked it :)

      Delete
  3. अतिशय आशयपूर्ण लिखाण आहे..
    मी तुझ्या मताशी एकदम सहमत आहे.. विचार तोच असतो पण प्रत्येकाची त्याच्याकडे बघण्याची आणि व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते..तीच माणसाला uniquness मिळवून देते..
    ही कविता खरंच खूप आवडली.. त्याला अर्थ आणि लय दोन्ही आहेत..वाचताना मनातल्या मनात चाल लागत जाते..

    (sorry Vinayak, tujhi akhkhi comment jashi chya tashi copy kartoy karan मी तुझ्या मताशी एकदम सहमत आहे) ;)

    Borkar: _/\_

    ReplyDelete
  4. शंतनू:
    अरे सहमत होऊन आपला uniqueness का घालवतोय..???
    तोच विचार एकदा unbiased होऊन पुन्हा करून बघ तुला तुझ्या मताचा पैलू सापडेल...

    ReplyDelete