Friday, September 22, 2017

प्रार्थना

लहानपण, शाळा आणि प्रार्थना यांचा आठवणींच्या राज्यात खूप जवळचा संबंध आहे. अजूनही प्रार्थना म्हणलं की 'खरा तो एकची धर्म' ही शाळेत म्हणत असलेली प्रार्थनाच चटकन ओठांवर येते. शाळा संपली असली तरी सुद्धा सिनेमा आणि इतर अल्बम मधून अधून मधून प्रार्थना कम गाणी तर ऐकायला मिळत असतातच. पण लक्षात राहतील, आपलेसे वाटतील असे शब्द, आपल्याला सहज गुणगुणता येईल अशी चाल असलेली नवीनच प्रार्थना खूप वर्षांनी ऐकायला मिळाली.

काही वर्षांपूर्वी 'नितळ' नावाच्या सिनेमा मध्ये पण अशीच एक कुणालाही गुणगुणता येईल आणि सोप्या शब्दात गहिरा अर्थ असलेली एक प्रार्थना ऐकली होती. बहुधा गंभीर विषयामुळे खूप कमी लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला असावा. 


मध्यंतरी डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातली प्रार्थना ' तू बुद्धी दे' खूप आवडली होती. का कोण जाणो, पण ती ऐकतानाही स्वतः गुणगुणावी अशी नाही वाटली. कदाचित आमटे कुटुंबियांइतक्या थोर लोकांनी केलेल्या त्यागाला, त्यांनी समाजोपयोगी कामाला वाहून घेतलेल्या आयुष्याला आपल्यापुढे ठेवणाऱ्या प्रसंगांच्या सोबतीने ती प्रार्थना चित्रपटातून आपल्यासमोर असल्याने ती म्हणण्याची लायकी पण आपली नाही अशी पण भावना कुठेतरी निर्माण झाली असावी नकळत मनात. 

मात्र बऱ्याच दिवसांनी 'उबुंटू' च्या निमित्ताने नितांतसुंदर साध्या चालीत बांधलेली पण अतिशय प्रभावी, अर्थपूर्ण गेय शब्द असलेली 'हीच अमुची प्रार्थना' ऐकायला मिळाली. विशेषतः शाळा, गुरुजी आणि शाळेतले विद्यार्थी यांच्या सोबतीने ती पडद्यावरती येत असल्यामुळेही असेल, पण खूपच छान वाटली. गाण्याच्या चित्रीकरणातल्या फ्रेम्स, प्रकाशछटा पण मला आवडल्या.


'भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे...' हे त्यातले शब्द मला खूपच भावले.

ही प्रार्थना ऐकताना, सोबतीने गुणगुणताना मला चित्त शांत होण्याबरोबरच जमिनीशी जोडल्याचा ( म्हणजे मला earthly feeling, feeling surrendered इ. इ. अर्थाच काहीतरी म्हणायचय पण नेमके शब्द सापडत नाहीयेत. समझनेवालो को इशारा काफी है! 😊) असा अनुभव आला. असं खूप कमी वेळेला होतं की त्या चालीत, त्या गाण्यात अपेक्षित असलेला भाव प्रेक्षक म्हणून माझ्याही मनात पण तेव्हढ्याच परिणामकारकरित्या दाटून आलाय. अन्यथा बहुतांशी तटस्थ दृष्टिकोनातूनच गाण ऐकलं जातं.

असो, तर खूप दिवसांनी अशी मस्त प्रार्थना सापडल्यामुळे मी खूष आहे. हिचं गाण म्हणून आयुष्य खूप असणार हे नक्की. निदान माझ्यासाठी तरी!

2 comments: