Friday, February 4, 2011

सहप्रवासी

 त्या दोघी, बेंगलोर-पुणे प्रवासात भेटलेल्या. अनपेक्षितपणे लांबलेल्या प्रवासात झालेली मैत्री.. की नुसतीच ओळख??...काहीही असो. सुरुवातीच्या काही तासांमधला तो अलिप्तपणा कधी विरघळून गेला कळलंही नाही. त्यातल्या त्यात ती एक जास्तच बोलकी. तितकीच निरागस. परीक्षा संपल्या संपल्या घरच्या ओढीनं मिळेल त्या गाडीनं जायचं म्हणून त्या गाडीत चढलेल्या. नेमका काही अपरिहार्य कारणांमुळे गाडीला उशीर. सुरुवातीच्या गप्पा अगदी जुजबी. ’ती’ चा ’तो’ ही त्याच गाडीत दुसर्‍या एका डब्यात. त्या दोघी आणि तो.. एक त्रिकोण. ’ती’ दुःखी. माझ्यासारख्या तिर्‍हाईतापाशी ’ती’ नं तिचं मन मोकळं केलं. ’दीदी, तुम ही बताओ मै क्या करूं??’ वर सल्ल्याचीही अपेक्षा. मी काय सल्ला देणार? कपाळ??? शेवटी कसंबसं चारदोन गोष्टी सांगून शांत केलं. प्रवास संपताना माझी पावलं माझ्याच नकळत जड झाल्याचं जाणवलं. ’ती’ने दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधायचा प्रयत्नही केला. संपर्क होऊ शकला नाही.


त्या आजी, त्याच प्रवासात भेटलेल्या. मुलीच्या घरी चाललेल्या. गाडी लेट आहे हे मुलीला माझ्या फोन वरून कळवलं. मुलगी काळजीत. सतत काही वेळाने संपर्क करत होती. व्यवस्थित सुखरूपपणे घरी पोहोचल्यावर पुन्हा त्यानी मला फोन केला. आभार मानण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी..


ते काका, रेल्वेत आम्ही संगणक वापरत असलेला पाहून लगेच त्यानी जुन्या गाण्यांची फर्माईश केलेली. मस्तपैकी गाणी ऐकत झालेला तो लांबलचक प्रवास कधी संपला ते कळलंही नाही.


ती, स्वारगेट-कर्वेनगर या संध्याकाळच्या वेळी रहदारीमुळे तास-सव्वा तास खाणार्‍या प्रवासात भेटलेली. ती च्या मांडीवर एक दोन-एक वर्षाची मुलगी. ’ती’ चांगली एल. एल. बी झालेली. एल. एल. एम ची तयारी करत होती. अगदी संसार संभाळून. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय प्रेमविवाह. सुरुवातीला सगळे आलबेल. लग्नानंतर मात्र घरच्या बाईने घरची जबाबदारी संभाळावी, माणसांचे हवे-नको ते बघावे असा सूर. माहेरचा आधार तुटलेला. त्यामुळे कात्रीत सापडलेली. त्या तासाभराच्या प्रवासात ’ती’ ने तिची व्यथा माझ्यासमोर मांडली. सांत्वन करण्यापलिकडची अवस्था. माझा थांबा आल्यावर मी उतरले.. ’ती’ मात्र तशीच मनामध्ये घोटाळत राहिली.


’ती’, माझी सख्खी मैत्रीण. तब्बल पाच वर्षे आम्ही एकाच बेंचवर बसायचो. शाळा संपल्यावर वाटा वेगळ्या झाल्या. सुरुवातीला असणारा सम्पर्क हळूहळू कमी होत बंद पडला. अचानक कधी तरी कुणाकडून तिच्या बद्दल समजलं. थोडं वाईटच वाटलं. अजूनही असं वाटतं अचानक ती समोर येउन उभी राहील..’काय ओळखलं का?’ असं विचारेल..आणि मी डोळ्यातलं पाणी हलकेच पुसून हसून म्हणेन.. ’गधडे, कुठे होतीस इतके दिवस??’





आपल्याला सतत वेगवेगळी माणसं भेटत असतात. निमित्त काहीही असो. काहींशी पटकन मैत्र जुळतं. काहींच्या बाबतीत कटू आठवणीही. थोड्या काळासाठी आपल्या आयुष्यात आलेली अशी माणसं. सहप्रवास काही क्षणांपासून काही वर्षांपर्यंतचाही... अचानकपणे अशाच आठवणी येतात.. मनात तरंग उमटवून जातात. काय करत असतील ही सगळीजणं आत्ता? कशी असतील? यापैकी किती जणांनी मला लक्षात ठेवलं असेल? किती जण माझी आठवण काढत असतील? असतीलही कदाचित.

कधी अनपेक्षितपणे त्यांची भेट झाली तर...

11 comments:

  1. Chhan vyakta zaliyes...Kharach, Aayushyachya deergha pravasat, thodya thodya kalasathi saath denare pravasi bhetat, mhanunach to pravas kadhi kantalvana hot nasava...ani ho tyanchya athwani tar ankhinach deergha kaal saath detat...

    ReplyDelete
  2. काय सही लिहिलं आहेस ! वाह ! तुला ह्या विषयावर लिहावसं का वाटलं, हे पण सांग जमल्यास. मनातल्या विचारांची मांडणी खरंच खूप छान केली आहेस..

    ReplyDelete
  3. आकांक्षा: खरंय तुझं म्हणणं.
    विनय:
    आपल्याला भेटलेल्या कितीतरी लोकांना आपण परत भेटण्याची शक्यता अजिबातच नसते. पण त्यांच्याशी निगडित कित्येक आठवणी मात्र असतात. बर्‍याचदा या सगळ्या माणसांना आपण काळापरत्वे विसरतो. अचानक त्यांची आठवण होते आणि ते सगळे परत भेटू शकले तर किती बरं होईल असं सतत वाटत राहतं. बहुतेककरून ते शक्य नसतच. त्याची बोच कुठेतरी लागून राहते. आणि मग असाही प्रश्न पडतो की आपल्याला जशी त्यांची आठवण येतेय, तशी त्यांनाही आपली येत असेल का? त्याना जर आपण परत भेटलो तर ते आपल्याला ओळखतील का? या प्रश्नांची उत्तरं मिळणं अवघड असल्यामुळे त्याचा त्रासही होतो.

    बाकी लोकांचं माहीत नाही पण मला अधूनमधून अशी कुणाकुणाची आठवण येत राहते. परवाही असंच झालं आणि त्याच भरात लिहावसं वाटलं म्हणून लिहिलं. बाकी खरं तर ही लिस्ट खूपच छोटी आहे. कदाचित असंही कुणी असू शकेल की मी विसरली आहे पण त्यांना मी व्यवस्थित आठवतेय. who knows??

    ReplyDelete
  4. very good, write up! i guess sudha murthy has written something about the people she met in her life. that book is also wonderful.. and another one is from V P that is " manasa" . that is masterpiece.. u just reminded me those amazing feeling which i shared while reading those books..

    why the perticular person always seems to be safe while opening out with the another person, while in the first meeting....may be the person feels safe that we dont know the past of all those incidents which he shares. and the joy or shock which we felt after hearing their story..

    ReplyDelete
  5. 1 number lihila ahes.. vyaktichitraN tu bhari kartesach, pan ha veglach prakar ahe! Suruvat wachun mala watla ki ha blog awadnar, pan pudhe pudhe guntat gelo.. awdi chya hi palikade gelo. lay bhari!!!

    ReplyDelete
  6. नचिकेत: अरे एव्हढ्या मोठ्या लोकांबरोबर कुठे रे माझी तुलना करतोस?? आणि व. पुं ची माणसं वाचायची पद्धत मलाही खूप आवडते. He was just great!!

    शंतनू: thanku thanku :-)

    ReplyDelete
  7. मेघना,
    नमस्कार.
    सहप्रवाशांबद्दलचे असे कितीतरी अनुभव असतात. मला हा प्रश्न पडतोः सर्वजण आपापली दुःखे सांगण्यासाठी माझीच निवड का करतात ? :).माझ्या चेह-यात या, 'मला सांगा. मी मोकळाच आहे ऐकायला' असा भाव असतो की काय, कोण जाणे.

    एकंदर लेखन छान.

    हेही पहा ः http://chaapeelshabda.wordpress.com
    http://kedarhowtodo.blogspot.com/

    ReplyDelete
  8. केदार,
    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
    तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लोकांना जर तुमच्यापाशी आपलं मन मोकळं करावसं वाटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे की!
    अशा वेळी आपल्याला कळतं की जगात आपल्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास असलेली लोकं आहेत. मग आपणच आपल्याला सुखी वाटू लागतो.

    BTW , तुमचे दोन्ही blogs चांगले आहेत. शुभेच्छा!

    ReplyDelete
  9. सुंदर. उत्कॄष्ट मांडणी आणि चपखल वर्णन. तुझं प्रतिबिंबही छान उमटलय ह्या लेखामधून.

    BTW, परवाच मला प्रवासात मेघना भेटली आणि मला कळायच्या आत मी तिने वर्णन केलेल्यासारख्या 'सहप्रवाशां'पैकी एक झालो :) तिने हा लेख लिहायच्या आधी भेटलो असतो, तर माझ्याबद्दलही एक परिच्छेद आला असता की काय असं वाटल्यावाचून रहात नाही...

    ReplyDelete
  10. @ पराग: हा हा हा! तुझ्याबद्दल परिच्छेद लिहिला असता किंवा नाही याबद्दल सांगणं कठीण आहे :p पण लक्षात राहण्यासारखा प्रवास होता हे नक्की :) प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete
  11. chhan lihilays..
    mazahi kahisa asach anubhav aahe...
    tyasathi madhyantari mihi ek blog just open kela hota.. "sare pravasi gadiche.."
    pan velechya ganitapudhe nahi jamla..
    mag deletch karun takla..
    anyways This one is really interesting.. keep writing..

    ReplyDelete