Showing posts with label people. Show all posts
Showing posts with label people. Show all posts

Friday, February 4, 2011

सहप्रवासी

 त्या दोघी, बेंगलोर-पुणे प्रवासात भेटलेल्या. अनपेक्षितपणे लांबलेल्या प्रवासात झालेली मैत्री.. की नुसतीच ओळख??...काहीही असो. सुरुवातीच्या काही तासांमधला तो अलिप्तपणा कधी विरघळून गेला कळलंही नाही. त्यातल्या त्यात ती एक जास्तच बोलकी. तितकीच निरागस. परीक्षा संपल्या संपल्या घरच्या ओढीनं मिळेल त्या गाडीनं जायचं म्हणून त्या गाडीत चढलेल्या. नेमका काही अपरिहार्य कारणांमुळे गाडीला उशीर. सुरुवातीच्या गप्पा अगदी जुजबी. ’ती’ चा ’तो’ ही त्याच गाडीत दुसर्‍या एका डब्यात. त्या दोघी आणि तो.. एक त्रिकोण. ’ती’ दुःखी. माझ्यासारख्या तिर्‍हाईतापाशी ’ती’ नं तिचं मन मोकळं केलं. ’दीदी, तुम ही बताओ मै क्या करूं??’ वर सल्ल्याचीही अपेक्षा. मी काय सल्ला देणार? कपाळ??? शेवटी कसंबसं चारदोन गोष्टी सांगून शांत केलं. प्रवास संपताना माझी पावलं माझ्याच नकळत जड झाल्याचं जाणवलं. ’ती’ने दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधायचा प्रयत्नही केला. संपर्क होऊ शकला नाही.


त्या आजी, त्याच प्रवासात भेटलेल्या. मुलीच्या घरी चाललेल्या. गाडी लेट आहे हे मुलीला माझ्या फोन वरून कळवलं. मुलगी काळजीत. सतत काही वेळाने संपर्क करत होती. व्यवस्थित सुखरूपपणे घरी पोहोचल्यावर पुन्हा त्यानी मला फोन केला. आभार मानण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी..


ते काका, रेल्वेत आम्ही संगणक वापरत असलेला पाहून लगेच त्यानी जुन्या गाण्यांची फर्माईश केलेली. मस्तपैकी गाणी ऐकत झालेला तो लांबलचक प्रवास कधी संपला ते कळलंही नाही.


ती, स्वारगेट-कर्वेनगर या संध्याकाळच्या वेळी रहदारीमुळे तास-सव्वा तास खाणार्‍या प्रवासात भेटलेली. ती च्या मांडीवर एक दोन-एक वर्षाची मुलगी. ’ती’ चांगली एल. एल. बी झालेली. एल. एल. एम ची तयारी करत होती. अगदी संसार संभाळून. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय प्रेमविवाह. सुरुवातीला सगळे आलबेल. लग्नानंतर मात्र घरच्या बाईने घरची जबाबदारी संभाळावी, माणसांचे हवे-नको ते बघावे असा सूर. माहेरचा आधार तुटलेला. त्यामुळे कात्रीत सापडलेली. त्या तासाभराच्या प्रवासात ’ती’ ने तिची व्यथा माझ्यासमोर मांडली. सांत्वन करण्यापलिकडची अवस्था. माझा थांबा आल्यावर मी उतरले.. ’ती’ मात्र तशीच मनामध्ये घोटाळत राहिली.


’ती’, माझी सख्खी मैत्रीण. तब्बल पाच वर्षे आम्ही एकाच बेंचवर बसायचो. शाळा संपल्यावर वाटा वेगळ्या झाल्या. सुरुवातीला असणारा सम्पर्क हळूहळू कमी होत बंद पडला. अचानक कधी तरी कुणाकडून तिच्या बद्दल समजलं. थोडं वाईटच वाटलं. अजूनही असं वाटतं अचानक ती समोर येउन उभी राहील..’काय ओळखलं का?’ असं विचारेल..आणि मी डोळ्यातलं पाणी हलकेच पुसून हसून म्हणेन.. ’गधडे, कुठे होतीस इतके दिवस??’





आपल्याला सतत वेगवेगळी माणसं भेटत असतात. निमित्त काहीही असो. काहींशी पटकन मैत्र जुळतं. काहींच्या बाबतीत कटू आठवणीही. थोड्या काळासाठी आपल्या आयुष्यात आलेली अशी माणसं. सहप्रवास काही क्षणांपासून काही वर्षांपर्यंतचाही... अचानकपणे अशाच आठवणी येतात.. मनात तरंग उमटवून जातात. काय करत असतील ही सगळीजणं आत्ता? कशी असतील? यापैकी किती जणांनी मला लक्षात ठेवलं असेल? किती जण माझी आठवण काढत असतील? असतीलही कदाचित.

कधी अनपेक्षितपणे त्यांची भेट झाली तर...

Monday, July 26, 2010

नातं

तुला कुठे जास्त आवडत? मुदुमलाईला की बेंगलोरला?

मला हा प्रश्न विचारला गेला आणि मी विचारात पडले. प्रश्न जितका सोपा तितकं उत्तर अवघड आहे. प्रत्येक जागेची स्वतःची अशी खासीयत आहे. एखाद्या जागेशी आपण इतके attach  कसे होऊ शकतो? इतके पटकन धागे जुळले कसे जाऊ शकतात?

बेंगलोर मला आवडत कारण मला ते थोडंफार पुण्यासारखाच वाटतं. शहरात रहायची सवय असल्यामुळे बेंगलोरशी जुळवून घेताना फार त्रास झाला नाही. मुळात या शहराचा मी अत्यन्त थोडा भागच जास्त बघितलाय. जितके दिवस मी तिथे असते तितके IISc च्या campus मधेच जास्त असते. त्यामुळे बाहेरच्या धकाधकीच्या, प्रदूषित आणि गजबजलेल्या भागात जायची गरजच मुळात नाही वाटत.
तिथे इतकी ओळखीची माणसं आहेत, मराठी आणि मराठेतरही. शिवाय एक दोन हक्काची घर आहेत, विचारपूस करणारी, काळजी करणारी मंडळी आहेत की सगळ वातावरणच आपलसं होऊन जातं.

मुदुमलाईबद्दल काय बोलणार? हे तर माझं second home आहे. इथे office आणि घर यात फारसा फरकच नाहीये. खूप informal आहे इथली lifestyle. इथे असलं की दिवसाचं आणि तारखेचं भानच उरत नाही. सगळे दिवस सारखेच!!! weekends ल सगळे इथे असले की वेळ कसा निघून जातो त्याचा पत्ताही नाही लागत. अशाच वेळी weekends ला इतकं काम करून होतं की जे पूर्ण आठवड्यात नाही झालं. कामाचा उत्साह आला की लगेचच काम करता येतं आणि कंटाळा आला की break घेताही येतो. कधीकधी हुक्की आली की आम्ही सकाळी अगदी सहा वाजता उठून कामाला लागतो, कधी रात्री उशीरापर्यंत काम करतो आणि दुपारी एखादा सिनेमाही बघतो.
मी एकदम शहरात वाढलेली असल्यामुळे मला खेडेगावात रहायचं आकर्षण पहिल्यापासूनच फार. शाळेत असताना माझ्या सगळ्या मैत्रीणी सुट्टीत गावी जायच्या. तेव्हा मला त्यान्चा खूप हेवा वाटायचा. असं वाटायचं, आमचं अस गाव का नाही बरं? असं छान कौलारु घरात रहायच स्वप्न कधितरी पाहिलं होतं मी. ते असं कामाच्या निमित्ताने पूर्ण होइल अस कधीच वाटलं नव्हतं. अक्षरशः मी सध्या paid vacation वर आहे अस म्हणायलाही हरकत नसावी.
व्हरांड्यात बसून आम्ही असा मस्त निसर्गाचा आस्वाद घेत घेत रोज जेवतो, प्रत्येक पाच मिनिटाला आजूबाजूचं वातावरण बदलत असतं, कधी स्वच्छ नितळ सूर्यप्रकाश, कधी गच्च भरलेलं आभाळ, कधी इतकं धुकं की समोरचं घर सुद्धा दिसत नाही. पावसाची भिंत सरकत सरकत आपल्या दिशेनं येताना कधी बघितलीच नव्हती या आधी. कधी समोरचा निलगिरी मस्त ऊन खात बसलेला असतो, तर कधी ढगात हरवून गेलेला असतो. वार्‍याचा जोर कधी इतका असतो की मी उडून जाइन अस वाटतं. picnic spot म्हटल तर बरेच आहेत, म्हटलं तर नाहीतही. पण असं काही असायलच हवं का? असं कुठेतरी छान जागी बसून निवांतपणे वेळ घालवला तर ती काय ट्रीप होऊ नये?
मुळात मी हे सगळ आधी अनुभवल नसल्यामुळे मला या सगळ्याचं जास्त अप्रूप वाटतही असेल. इथे असलेल्या इतर सुविधांमुळे इथलं आमचं जीवन खूपच सुसह्य आहे हेही तितकंच सत्य आहे. इथे २४ तास वीज उपलब्ध असते. बराच वेळ वीज नाही असं गेल्या सम्पूर्ण वर्षात फक्त २-३ वेळाच घडलंय. पाणीही मुबलक प्रंमाणात उपलब्ध आहे. ईंटरनेट आहे. खाण्यापिण्याची चंगळ आहे. त्यामुळेही कदाचित मी इथे पटकन रुळले असेन.
पण त्याहीपेक्षा इथली माणसं ही जास्त कारणीभूत असावीत असं मला वाटतं. इथल्या Ph. D students/ researchers  मुळे मला आणि मीराला कधी एकटं नाही वाटलं. उलट त्यांच्या बरोबर गप्पा मारताना, त्यांच्या कामाबद्दल जाणून घेता आलं. हळूहळू आम्हालाही त्यात रस वाटू लागलाय. आमच्याच विषयाकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोन बदललाय. या सगळ्यांबरोबर राहण्याची खूप सवय झालीये आता.
यापेक्षा दुसर काय हवं? नाहीतर एकटेपणी स्वर्गात जरी ठेवलं तरी कोणाचं मन रमेल असं वाटत नाही मला. निदान माझं तरी नक्कीच नही रमणार.

जगात इतर अनेक यापेक्षा सुंदर, निसर्गाचा वरदहस्त असलेल्या जागा असतीलही. नव्हे, निश्चितच आहेत. पण माझं नातं या जागेशी, इथल्या माणसांशी जुळलय खरं, अगदी मनापासून.

Friday, June 25, 2010

भूतकाळात डोकावताना...२

दादाआजोबा आणि माईआजी

दादाआजोबांबद्दल मी जेव्हाजेव्हा विचार करते तेव्हातेव्हा त्यांची शांत मूर्तीच डोळ्यासमोर येते. मी जेव्हढं त्यांना बघितलंय तेव्हढ्या सगळ्या आठवणींत त्यांची रागावलेली मुद्रा तर सोडाच पण कुणाबद्दल उणादुणा शब्द उच्चारल्याची साधी खूणही सापडत नाही. आजोबांची पूर्ण भगवद्गीता पाठ होती. ते बर्‍याचदा पूर्ण गीता वाचायचे. दुपारच्या शांत वेळी त्यांच गीतापठण चालू असताना आम्हाला त्याना डिस्टर्ब न करण्याचा इशारा मिळत असे. अर्थात त्यांना डिस्टर्ब केलं तरी ते कही ओरडाबिरडायचे नाहीत, पण मुळात त्याना बघून आम्हाला तशी इच्छाही नाही व्हायची. हृदयविकाराचा झटका येउन गेल्यानंतर त्यांनी स्वतःला जे maintain  केलं होतं ते खरोखर दाद देण्यासारखं होतं. वेळच्यावेळी औषधं घेणं, कुठली औषधं संपली आहेत, कुठली आणायची आहेत त्याची यादी करुन ती आणणं/आणवणं हे अगदी शिस्तीत आणि वेळच्या वेळी व्हायचं. कुणीही न सांगता सवरता!
त्यांच्या अतिशांत वृत्तीमुळे माईआजीचा मात्र भडका उडायचा कधीकधी!! माईआजी माझ्या आईची सावत्र आई. खरं तर हा शब्द उच्चारताना मला इतका त्रास होतोय की कुणी कल्पनाही नाही करु शकणार. ही गोष्ट मला फार उशीरा म्हणजे दहावीला गेल्यावर समजली. आईची आई गेली तेव्हा समस्त मामा-मावशी मंडळी लहान होती म्हणून माझ्या पणजोबांनी आजोबांना दुसरं लग्न करायला लावलं असं नंतर आईशी बोलताना समजलं. अर्थात त्याकाळी दुसर लग्न ही काही फार मोठी बाब नव्हती. याबद्दल इथे लिहीण्याचं खरं तर काहीच कारण नाही.पण मला अतिशय अभिमान वाटतो या गोष्टीचा की तो so called ’सावत्रपणा’ कुठल्याच बाबतीत अजिबात आड आला नाही. कधीच नाही.त्यामुळे जेव्हाजेव्हा मी या गोष्टीचा विचार करते तेव्हातेव्हा माझ्या मनातला तिच्याबद्दलचा आदर दुप्पट वाढतो.
किंबहुना मी माझ्या सगळ्या मामांमधे शैलेश-प्रसाद मामांच्या जास्त जवळ आहे. शनवारात राहत असेपर्यंत ठीक होतं, पण कोथरूडला शिफ़्ट झाल्यावर गावात खरेदीबिरेदीसठी जाताना आजीला मामी किंवा माझी आई सोबत लागायचीच. आजीच्या हातची शेवयाची खीर आणि चैत्रागौरीच्या वेळची कैरीची आंबट डाळ-पन्हं हे पदार्थ माझ्या विशेष आवडीचे होते.
आजी छोट्या छोट्या गोष्टींचंही कौतुक करायची. एकदा तर धुतलेलं धुणं मी नीट दांडीवर वाळत टाकल्यामुळे तिने मला खूश होऊन शाबासकी दिली होती. आदित्यने जेव्हा पहिल्या पगारातून त्यांना cordless phone घेउन दिला होत तेव्हा तिनं तो सगळ्यांना मोठ्या कौतुकाने दाखवला होता. नातवाचा अभिमान तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता.
तेव्हाच मीही ठरवलं होतं की मी पण नोकरी लागली त्यांच्या्साठी नक्की काहीतरी घेईन. या सार्‍या गोष्टींना आता फार उशीर झालाय खरं तर. काळाने ती संधी माझ्याकडून कढून घेतलीये. काळाचा तरी काय दोष म्हणा, माझ्या अजागळ पणामुळेच झालंय हे सगळं.
बंगलोरला आल्यावर दोनदा पुण्याला जाणं झालं. अनिरुद्धच्या बारशाच्या वेळी आजोबांना चालणं शक्य नसल्याने फक्त आजीच आली होती.नंतर जेव्हा फ़ेब्रुवारीत गेले तेव्हा गेल्याबरोबर आजोबांच्या जाण्याचा धक्का सहन करावा लागला होता. आजोबांचं शेवटचं दर्शन केवळ एका दिवसाने चुकलं! आणि आता चार महिन्यांतच आजीही गेली. तिच अखेरचं दर्शनच काय तर दहाव्यालाही मी तिकडे नसणार. मी इतकी कमनशिबी कशी???

Sunday, June 20, 2010

भूतकाळात डोकावताना... १

काय लिहू आणि कुठून सुरुवात करु तेच समजत नाहिये. आज माईआजी गेली. गेल्या चार महिन्यातली ही दुसरी घटना आणि गेल्या दोन वर्षातली सहावी. मोत्याची माळ तुटून एक एक करत मोती गळावेत तसतसे एक एक करुन सगळे गेले. आजी आजोबांच्या त्या पूर्ण पिढीचं अस्तित्व आता संपलय. इतक्या सार्‍या घटना इतक्या कमी काळात घडल्या आहेत, की आता डोळ्यातले अश्रूसुद्धा बंड करून उठलेत. मन मात्र प्रत्येकवेळी तितकंच सैरभैर होतं. आजही तसंच झालंय. सगळ्यांच्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत. त्या आठवणींचे मोती मी वेचण्याच प्रयत्न करतेय.
खरं तर कुठल्याच आजी आजोबांची मी ’अगदी लाडाची’ वगैरे अजिबातच नव्हते. अनेक नातवंडांपैकी मीही एक. पण आईचे काका काकू-ज्यांना मी काकाआजोबा आणि काकूआजी म्हणायचे, आईचे आई-वडिल म्हणजे माईआजी-दादाआजोबा आणि बाबांचे आई-वडिल -केंदूरचे आजी आजोबा यांच्याबद्दलच्या कितीतरी आठवणींनी कितीतरी वेळापासून माझ्या मनात फेर धरलाय.


काकाआजोबा आणि काकूआजी 


माझ्या शाळेपासून माझं आजोळ खूप जवळ होतं. शाळा सुटली की मी तिकडे जायचे. आई तिथे माझी वाट बघत थांबलेली असायची.
मग काकूआजी कधी थालीपीठ तर कधी साखरांबा-पोळी द्यायची. दुपारच्या वेळेला टी.व्ही वर ’हम पाँच’ आणि ’शांती’ नावाच्या सीरीयल्स लागायच्या. काकाआजोबा या सीरीयल्सचं नेहमीचं गिर्‍हाईक!!! त्यावेळी फार काही कळत नसताना (मुळात कळून घ्यायची आवश्यकता नसताना) मी ती त्यांच्याबरोबर बघायचे. ’हम पाँच’ चं attraction एव्हढ्यासाठी, की त्यात प्रिया तेंडूलकर फोटोतून बोलताना दाखवायचे. त्यावेळी ते फार गंमतशीर वाटे.
काकाआजोबांनी फुलवलेली बाग हा आवडीचा विषय. विशेषतः संध्याकाळच्या झाडांना पाणी घालायच्या वेळेची आम्ही आतुरतेनं वाट बघायचो. नळीने पाणी घालायची पहिल्यांदा संधी मिळावी म्हणून आजोबांकडे वशिला लावायचो. झाडांना पाणी घालणे यापेक्षाही पाणी घालायच्या नळीला पुढे बोट लावून सर्वात लांब फवारा कोणाचा जातो, यातच स्पर्धा असायची. अंगणात सडा घालण्याचं काम आम्ही मोठ्या हौसेनं करायचो. त्या नादात रस्त्यावरची जाणारीयेणारी लोकं भिजायची! तक्रार अर्थातच आजोबांकडे! पण पुनःश्च ’येरे माझ्या मागल्या’ व्हायला कितीसा वेळ लागतो?
जोवर पणजीआजी होती तोवर तिचा एक लिमलेट्च्या, श्रीखंडाच्या गोळ्यांचा खास असा डबा असायचा. खूश झाली, कि ती त्यातनं हळूच एक गोळी काढून हातावर ठेवी. इकडे काकाआजोबांच्या भाजक्या बडिशेपच्या डब्यावरही आमचा डोळा असायचा. त्या खास बडिशेपचे बकाणेच्या बकाणे आम्ही भरायचो.
काम करताना एकीकडे ’श्रीराम जय राम जय जय राम’ चा जप चालायचा. काहीही झालं की त्यांचं- "तो आहे ना वर बसलेला..बघतोय सगळं. तो माझा श्रीरामच मल सगळं देईल!" हे वाक्य कायम असायचं.
काकू आजी गेली तो दिवस अजून आठवतोय मला...गौरी जेवायचा दिवस होता तो. सौभाग्याचं लेणं लेवून -अहेवपणी ती गेली. तिच्या देहावर फुलं टाकून तिचं शेवटचं दर्शन घेताना असं वाटत होतं की जणू तिचा श्वासोच्छ्वास मंदपणे अजूनही चालू आहे. ती थरथर जी मला जाणवत होती ती खरोखरची होती की केवळ माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे मला तसा भास झाला होता हे माझ्यासाठी अजूनही न उलगडलेलं कोडं आहे.
काकूआजी हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट असताना एकदा माझ्या आईने तिच्यासाठी तांदुळाची उकड करून नेली होती. त्यातली तिने खाउन झाल्यावर उरलेली उकड मी संपवली होती. त्यानन्तर कित्येकदा आईने उकड केली, पण त्यादिवशीच्या उकडीची चव मला परत कधीच अनुभवायला मिळालेली नाही. आता तर तांदुळाची उकड आणि काकूआजी या दोन्ही आठवणी येताना  सोबत हातात हात घालूनच येतात..........

Saturday, May 1, 2010

सोबत


पालटले आहेत दिवस तुझे..
देण्यासारखं आता तुझ्याजवळ काहीच नाही उरलं...
द्यायला होतं तेव्हा खूप काही दिलंस तू..
अगदी कसलाही विचार न करता

आता नशीबच फिरलं आहे जणू
कुणीच उरलं नाही तुझ्या साथीला..
पण मी मात्र विसरलो नाहीये तुला.
विसरू तरी कसा शकतो मी?
तुझ्याच तर अंगाखांद्यावर खेळलो, वाढलो.
उंच आभाळात झेप घ्यायला शिकलो.

गेले त्यांना जाऊ देत,
मी मात्र तुझ्याबरोबरच राहीन..
पुढच्या पावसाची वाट बघत .. सदैव..

P.S. @ Deep, sorry again. I started writing this post in english, switched to hindi; but ended up in marathi again. It is much easier to put my feelings in marathi. :(