Monday, May 9, 2011

खेळ मांडियेला..


कधी कधी अतिशय अनपेक्षित प्रसंग घडतात. बरे-वाईट कसेही असोत, काही मनःपटलावर कोरले जातात. सुतराम म्हणतात, तसादेखील संबंध नसताना आपण एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे साक्षीदार होतो. नशीब - दैव अश गोष्टी सत्य आहेत की नाहीत असे प्रश्न अशा वेळी विचारता उपयोगाचे नसतात. जर त्या अनुभवावर आपलं नाव कोरलेलं असेल तर फक्त आणि फक्त साक्षीभावाने येणार्‍या प्रसंगाला सामोरं जाणं इतकंच आपल्या हातात उरतं.
लहानपणी खेळल्या जाणार्‍या अनेक खेळांपैकी चोर-पोलीस हा एक खेळ. चोर होणं कोणाला मान्य असतं बरं? प्रत्येकाला पोलीसंच व्हायचं असतं. मीही त्यला अपवाद नाही. प्रत्यक्षात मात्र किती अवघड आणि जबाबदारीचं काम आहे हे! एखादी संशयित व्यक्ती खरी की खोटी? कसं ठरवायचं? कुठली कसोटी लावायची? जितकं एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधावं तितकं प्रश्नांच्या गर्तेत अधिकाधिक खोल गेल्यासारखं वाटतं.

हजार प्रश्न. त्याची हजार उत्तरं. काय सत्य? काय असत्य? एक खोटं दुसर्‍या खोट्याला जन्म देतं असं म्हणतात. मूळ खोट्याशी (किंबहुना खर्‍या उत्तराशी) पोहोचावं कसं? बरं ते खरं नाही- खोटंच- हे कशावरून? आपण आपल्या बुद्धीच्या, तर्काच्या मर्यादेच्या बाहेर नाही जाउन विचार करू शकत. आपल्या जाणीवा आपल्याला आलेल्या अनुभवांनी समृद्ध होत असतात. त्यावरुन आपण बाकीचं जग पडताळत, आजमावत असतो. ’पाच आंधळे आणि हत्ती’ ची गोष्ट नाही का? प्रत्येकाला समजलेला हत्ती वेगळाच.
आयुष्याची वेगळी अशी - dark side - ही असू शकते, जिचा अंदाज आपल्याला नसू शकतो. आपल्या चष्म्यातून जग न्याहाळताना याचा विसर आपल्याला पडू शकत नाही का?

एक माणूस. त्याचा संशयास्पद वावर त्याला पोलिसांच्या नजरेत भरवतो. त्यातून निर्माण झालेली चौकशीची गरज. यात अर्थाअर्थी माझा तसा काहीच संबंध नाही. पण निमित्त हे, की संशयित व्यक्ती हिंदी बोलणारी आणि पोलिसाला हिंदीचा गंध नाही. त्यामुळे माझं काम दुभाषीचं. प्रश्नोत्तराची प्रक्रिया माझ्याद्वारे चालू. ही प्रकिया इतकी वेदनामय, की नसती आपल्याला ही भाषा समजत तर बरं झालं असतं असा विचार माझ्या मनात एकदम चमकून गेला. संशय एकदा निर्माण झाला की तो अधिकाधिक बळावतच जातो. तसंच काहीसं यावेळीही झालं. प्रश्नोत्तरागणिक संशय वाढत होता. खरं बोलत असला तरी समजणार कसं? त्यासाठी पर्याय, साधन काहीच नाही. सर्व दरवाजे जवळपास बंद. चौकशी संपली खरी. डोक्यातले विचार मात्र संपले नाहीत. ते थैमान घालतच होते.

’तो’ नक्की कोण? खरा की खोटा? का त्याच्यावर अशी वेळ यावी? नियतीच्या मनात काय आहे नक्की?

काहीही असो. सत्य लवकर सामोरं यावं. सत्याचाच विजय व्हावा अशी अपेक्षा करण्याउपर आपण काहीच करु शकत नाही.

’तो’ कायमचा लक्षात राहील ही गोष्ट मात्र पक्की.
माझ्या लिस्ट मधे उग्गाच आता आणखी एकाची भर पडली आहे.

5 comments:

 1. एक नवा आणि थोडा हटके अनुभव ....Nice post ....

  ReplyDelete
 2. well scripted..
  i would like to hear ’पाच आंधळे आणि हत्ती..

  ReplyDelete
 3. @ akanksha: ho ga.. kharach hat ke anubhav hota.

  @ Nachiket: are khoop lahanpani aikaleli aahe. bahudha tula 'panchatantra' kimva 'hitopadesh' asalya pustakat sapadel..

  ReplyDelete
 4. ही post वाचतांना मला (थोडासा) उगाचच 'twelve angry men' आठवला. हा लेख आणि तो चित्रपट ह्यांच्यातील समान धागा सुज्ञ वाचकास सांगणे न लागे :)

  ReplyDelete
 5. @ पराग: बघायला पाहिजे हा सिनेमा. बघुयात कधी जमतंय ते. तू म्हणाला तस आधी प्रसंग लिहायला पाहिजे होता असं मलाही वाटतंय. आणि माझ्या त्या प्रतिक्रिया खूप विस्कळीत वाटताहेत आता वाचताना. पुढच्या वेळी नक्की विचार करून लिहीन लिहिताना :)

  ReplyDelete