Tuesday, April 13, 2010

हे जीवन सुंदर आहे...

गेले काही दिवस मी बऱ्यापैकी 'अवचट' मय होऊन गेले आहे.याआधी प्रकाश नारायण संत, शिवाजी सावंत, व पु, पु. ल. आणि असेच कितीतरी लोक वाचताना अशीच हरवून गेले होते. एखाद्याच्या लिखाणाने भारावून गेले आहे अशी अवस्था खूप दिवसांनी अनुभवायला मिळाली.
व.पु. नी कुठेतरी म्हटलंय, की श्रेष्ठ लिखाण कोणतं? तर जे इतकं सहज आहे की अरेच्चा, हे आपल्याला का नाही सुचलं बुवा? असं वाटायला लागेल असं कोणतंही लिखाण.
अवचट वाचताना असंच क्षणोक्षणी जाणवत. 'जगणं' म्हणजे काय हे कळून घ्यायचं असेल तर अवचटांच कुठलही पुस्तक वाचावं. काही दिवसांपूर्वी माझ्या हातात त्यांच 'स्वतःविषयी' हे पुस्तक आल. ते झपाट्यानं वाचून काढलं. आणि त्यानंतर लगेचच त्यांचं 'सुनंदाला आठवताना' हेही मिळालं. खर तर सध्या परीक्षा, submissions आणि presentation यांची टांगती तलवार डोक्यावर आहे. तरीही काल 'सुनंदाला आठवताना' वाचायला सुरुवात केली आणि ते संपवूनच थांबले.
एक विलक्षण अनुभव होता तो. सहजीवन कसं असावं, याचा जणू काही आदर्शच. त्याचबरोबर भारावून जायला झालं ते सुनंदा अवचट यांच्याबद्दल जाणून घेतल्यामुळे. संपूर्ण लेख म्हणजे एक आरसा आहे, सुनंदा अवचट या व्यक्तिमत्त्वाचा. नकळत मन तुलना करू लागलं.त्यांचा शिस्तशीरपणा, नेटकेपणा, कामाचा उरक, सगळंच 'perfectionist ' या शिक्क्याला साजेसं. वाटत होतं, अरे, आपण यातलं निम्मं जरी उचलू शकलो तरी आपली किती प्रगती होईल.
वाढदिवसाचं present म्हणून आपल्यामधला एखादा दुर्गुण कमी करणे ही किती मोठी गोष्ट आहे! अवचट म्हणतात, नंतर नंतर एकमेकांमधल्या खटकणाऱ्या गोष्टीच संपल्या!! किती सहज म्हणून जातात ते हे. 'स्वतःविषयी' या पुस्तकात बऱ्याचदा असा उल्लेख आला आहे की, सुनंदा आणि अनिल यांच्या लग्नाला अवचटांच्या घरून विरोध होता.आणि या लेखात तर पदोपदी असा उल्लेख आला आहे की अवचटांचे आई-वडील आणि इतर नातेवाईक यांच्याशी सुनंदा अवचटांनी किती चांगले संबंध जोपासले होते.खरच एखादा माणूस आपल्या वागण्याने अशी सगळ्यांची मने जिंकून घेऊ शकतो?
त्यांच्या रुग्णांशी वागणुकीचे तर कितीतरी दाखले वाचताना जाणवतात. आपुलकी, जिव्हाळा, एखाद्याच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा केलेलं कौतुक समोरच्या माणसाला उभारी द्यायला पुरेसा पडतो हे त्यांनी जणूकाही सिद्धच केलं. मुक्तांगण बद्दल वाचताना तर थक्कच झाले. माणसांच्या मनातल ओळखण्याची जादू होती की काय त्यांच्याकडे? कसा जमत असेल ते सगळं?
सर्वात जास्त वाईट वाटले ते त्यांच्या कॅन्सर निदानाबद्दल वाचताना. इतका positive approch आयुष्याबद्दल माणसाजवळ असू शकतो? कसं काय? कॅन्सरच्या निदानानंतर त्या आठ वर्षे जगल्या. अवचट म्हणतात, 'ती आठ वर्षे ऐंशी वर्षांपेक्षा मोठी. आम्ही कधी नव्हतो, एव्हढे जवळ आलो, समरसून जगलो. या आजारानं वेळेची किंमत कळाली. '
पेशंटनीच डॉक्टरला धीर दिल्याचं कुणी कधी ऐकलय का? त्यांच्या बाबतीत तर अजबच, आपण स्वतः केमो साठी admit असताना दुसऱ्या पेशंटच counselling करणं त्याच जाणोत.
शेवटी काय, असलेल आयुष्य पूर्णपणे भरभरून जगणं यापेक्षा चांगलं काय? सुनंदा आणि अनिल अवचट यांच्याबद्दल वाचताना हेच जाणवत. प्रवीण दवणेंच्या भाषेत 'जगण्याचा सोहळा' साजरा करीत असलेली माणसे ही.. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? त्यांच्यासारखं भरभरून जगायला आवडेल हे मात्र खर..

2 comments:

  1. pustak wachlyawar asa bharawun jana mala far awadata !
    असलेल आयुष्य पूर्णपणे भरभरून जगणं यापेक्षा चांगलं काय? he suddha far chhan wakya ahe.

    ReplyDelete
  2. best post. tu vichar evdhe sundar mandle ahes, ki mi comment madhe tya pustaka baddal kahi lihina mhanje vichka hoil. itkach mhanto, ki mala khup khup avadlela pustak, ani khup khup avadlela manus.

    ReplyDelete