Monday, April 5, 2010

nostalgia..

आज सहजच जुने फोटो बघत बसले होते. आणि अचानकच हाती आला एक अल्बम (सॉरी, फोल्डर!).
डिसेंबर '०९ च्या पहिल्या आठवड्यात एका आदिवासी शाळेत जायची संधी मिळाली होती.
ANCF म्हणजे Asian Natural conservation foundation यांच्यातर्फे एक उपक्रम राबवला जातो. बरेचसे स्वयंसेवक वेगवेगळ्या आदिवासी शाळेत जाऊन
वेगवेगळे विषय (बहुतेक करून शास्त्र निगडीत) शिकवतात. पर्यावरणशास्त्र हा त्यातला मुख्य भाग असतो.
कारण बहुधा या सगळ्या शाळा अगदी छोट्याशा खेडेगावातल्या आहेत. इथे येणारी जवळपास सगळी मुलं कुठल्या ना कुठल्या आदिवासी जमातीतली आहेत.
त्यामुळेच निसर्ग हा त्यांच्या आयुष्यातला बराच मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे.

असेच त्या वेळी गीता field station वर आली होती. ती दोन दिवस तिकडे राहणार होती. २-३ शाळात जाऊन चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्याचं तिने ठरवलं होतं. त्यासाठी तिने बरीच बक्षिसे ही आणली होती मुलांना वाटण्यासाठी. वेळ होतं त्यामुळे मी तिला सहजच म्हटलं की मी आले तर चालेल का? मला खूप आवडेल या मध्ये सहभागी व्हायला. तिने लगेचच संमती दिली.

बोक्कापुरम ते उटी रस्त्यावर बोक्कापुरम पासून ३-४ kilometer वर मावनहल्ला म्हणून एक अतिशय छोटं आणि मस्त गाव आहे. तिकडे जायचं ठरलं होतं.
स्पर्धेसाठी मुख्यतः तीन गट केले होते. अगदी छोटे म्हणजे बालवाडी ते दुसरी, मध्यम म्हणजे तिसरी ते पाचवी-सहावी आणि मोठा म्हणजे नववी दहावीपर्यंत.
छोटा गट आणि मध्यम गटासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली तर मोठ्या गटासाठी निबंध.

आम्ही गेलो तेव्हा तिथल्या शिक्षक शिक्षिका आपापल्या वर्गांवर शिकवत होते. आम्ही गेल्यावर मात्र आमच्यासाठी खास वेळ देण्यात आला.

ही शाळा मला अतिशय मनापासून आवडली. एक तर खूप वर्षांनी शाळेत पाऊल टाकत होते. त्यामुळे माझी शाळा, शाळेतले दिवस, बेंचेस, युनिफॉर्म वगैरे खूप आठवत होतं. जणूकाही मी स्वतःलाच त्या मुलांच्या ठिकाणी परत पाहत होते.
बालवाडी, पहिली दुसरी या तिन्ही वर्गांसाठी एकाच शिक्षिका होत्या. तीच गट जराशा मोठ्या चौथी पाचवीच्या वर्गांसाठी. कारण इथल्या विद्यार्थ्यांची संख्या तशी बरीच कमी आहे. जरी विध्यार्थ्याने नाव शाळेत घातले असले तरी तो शाळेत येईलच नियमितपणे याची खात्री अजिबात नाही. कारण मुळातच अभ्यासाची गरज त्यांना फारशी जाणवत नसावी. आम्ही गेलो तेव्हा तिथले एक शिक्षक एका विद्यार्थ्याची चौकशी दुसऱ्या मुलांकडे करत होते (अर्थातच तमिळ मधून!!) तो मुलगा बरेच दिवस शाळेत आला नसावा. ते शिक्षक ज्या तळमळीनं मुलांना शाळेत या म्हणून सांगत होते ते बघून खूप भरून आलं. खरच किती अवघड आहे अशी मुलं सांभाळणं..जरीही ते तमिळ मधून बोलत असले तरी त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांच्या आविर्भावावरून लगेचच कळत होतं. खरच खूप dedicated शिक्षकच हवेत अशा ठिकाणी.

आम्ही चित्रकला आणि निबंध स्पर्धा त्या मुलांना विषय देऊन सुरु केली. तसा विषय असा काहीच दिला नव्हता. चित्रकलेसाठी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जे आवडेल, तुमच्या मनात जे चित्र असेल ते काढा. इथे एक खूप छान आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे जेव्हढी मुले चित्र काढत होती त्यापैकी जवळपास सर्व..म्हणजे दोन तीन सोडल्यास, सर्व मुलांच्या चित्रांचे विषय निसर्गाशी संबंधित होते. म्हणजे अगदी हरीण, सांबर, हत्ती, मोर आणि पक्षी वगैरे सुद्धा या मुलांनी अतिशय सहजतेने आणि सुंदर काढले होते. मुळातच त्यांची निरीक्षणशक्ती किती जबरदस्त होती हे लगेचच कळून येत होतं. हरीण, सांबर किंवा मोर काढताना shape , size यांचा जे आकलन होतं ते खरोखर शब्दात नाही मांडू शकत मी इथे. त्याचवेळेला मला सकाळ मध्ये दर रविवारी बालवाचकांची जी चित्रे प्रसिद्ध होतात ती आठवली. नव्वद ते पंच्याण्णव टक्के विषय कार्टून किंवा animation किंवा तत्सम असतात. यावरून मी विचार करत होते की मुलांना जे अवतीभवती दिसत त्याप्रमाणे विचार करायची किंवा वागायची सवय लागते. निसर्गाच्या सानिध्याच महत्त्व मला खरच तिथे पटत होतं.

हे सगळं होत असताना आम्ही त्या सगळ्या वर्गातून फिरत होतो. पहिल्यांदा आम्ही वर्गात गेलो तेव्हा तिथल्या बाईंनी त्या मुलांना उभ राहायला लावून आम्हाला 'good morning madam' म्हणायला लावलं होतं. खूप awkward feel झालं तेव्हा. हे transition कधी झालं आणि मी 'madam' कधी झाले हे मलाही कळलं नाही. आणि नंतर जेव्हा जेव्हा मी त्या वर्गात चक्कर टाकली तेव्हा तेव्हा ती छोटी चिल्लीपिल्ली हातातल काम टाकून मला 'good morning madam ' म्हणत होती. त्यात मलाही मजा आली आणि बहुधा त्यानाही मजा वाटत असावी. मधल्या वेळेत मी त्यांची नावं विचारण्याचा प्रयत्न केला. आता ती नावं लक्षात नाहीत पण एकीचं नाव 'रोजा' होतं हे चांगलाच आठवत. (फिल्म effect होता की काय असा विचार माझ्या मनाला सहजच शिवून गेला!) निबंध स्पर्धाही बऱ्यापैकी चांगली झाली. काही मुलांनी भरभरून लिहिलं तर काहींनी अगदी जबरदस्ती केल्यासारखं चार ओळी खरडून दिल्या होत्या. तमिळ असल्यामुळे अर्थातच तिथेही काहीच scope नव्हता मला.. पण एकंदरीत हस्ताक्षर आणि नीटनेटकेपणा यावरून मी अंदाज बंधू शकत होते की कुणी बरा लिहिला असावा.

स्पर्धा सुरु असताना मी सहजच तिथल्या एका शिक्षकांशीही बोलले. त्यांनी सांगितला की त्या मुलांना जनरली एक शैक्षणिक वर्ष संपवायला दीड कॅलेंडर year लागतात. त्या शिक्षकांना इंग्रजी आणि तमिळ याशिवाय कुठलीच भाषा येत नव्हती. त्यामुळे मला माझी मातृभाषा म्हणजे मराठी आणि इंग्रजी सोडून हिंदी पण येत याच फार अप्रूप वाटत होतं. त्यांच्या विनंतीवरून मी त्यांचं नाव हिंदीत पण लिहून दाखवलं. कदाचित त्यांनी अजूनही तो त्यांचं नाव लिहिलेला चीठोरा जपून ठेवला असेल.

चित्रकलेचा निकाल लावणं खरोखर आम्हाला खूप अवघड गेलं. आम्ही तिथल्या मुख्याध्यापिकेला विनंती केली की तुम्ही आम्हाला निकाल ठरवण्यासाठी मदत करा. पण त्यांच्या मते त्यांना सगळी मुले माहित होती त्यामुळे त्यांनी लावलेला निकाल biased होऊ शकला असता. त्यानुळे त्यांनी नकार दिला. शेवटी मी, गीता आणि शक्ती अशा तिघांनी मिळून prize winners ठरवले.

बक्षीस समारंभ दुसऱ्या दिवशी असल्या कारणाने मी जाऊ शकले नाही. पण तो दिवस माझ्यासाठी खूप संस्मरणीय ठरला. मला तमिळ येत नाही याचा सगळ्यात जास्त वाईट त्या दिवशी मला तिथे वाटलं. कारण इतक्या छान छोट्या मुलांशी मी काही निवडक इंग्रजी शब्दांव्यतिरिक्त काहीच बोलू शकले नाही.

पण हा अनुभव एकंदरीतच इतका मस्त होता की मी पुन्हा तिथे जायचच असं ठरवूनच परत आले. आता बघूयात परत केव्हा संधी मिळते ते!!

No comments:

Post a Comment