कधी कधी खरच आश्चर्य वाटतं... अचंबित व्हायला होतं...
खरंच, अगदी लहान असताना माझ्या विश्वात आई,बाबा, दादा यांच्याशिवाय कुणीच नव्हतं.
हळूहळू त्यात शाळा, शाळेतल्या मैत्रिणी, शिक्षक सामील झाले..
नंतर कॉलेज, क्लास, इतर आजूबाजूचे ओळखीचे लोक आले.
कॉलेजला गेल्यानंतर कुणी शाळेतलं भेटलं की अतिशय आनंद व्हायचा.
युनिव्हर्सिटीमध्ये पाऊल टाकल्यावर कुणी आपल्या कॉलेजच भेटलं म्हणजे खूप बरं वाटायचं.
आणि आता, आता घराच्या बाहेर पडले आहे, पुण्याच्या बाहेर पडले आहे.
बंगलोरला आल्यावर अगदी सुरुवातीच्या काळात कुणीही मराठी आणि त्यातून पुण्याचं कुणी भेटलं की किती आनंद व्हायचा म्हणून सांगू .
इथे आल्यावर खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली, वेगवेगळ्या स्तरातली, वेगवेगळ्या ठिकाणची माणसं भेटली..अजूनही भेटताहेत.
आता कुणीही महाराष्ट्रीय माणूस भेटलं तरी आपुलकी वाटते. IISC च्या campus मधून बाहेर पडलं आणि IISC तला जरी कुणी दिसलं तरी
'अरे, हा/ ही तर IISC तली दिसतेय' असा सहजच विचार शिवून जातो.
मुदुमलाईला गेल्यापासून तिथले लोक, तिथले आदिवासी, आमच्या इथे काम करणारी माणस यांच्याशी एक आपुलकीच नात निर्माण झालं.
मध्ये पुण्याला गेले होते तेव्हा अचानकच मला एक जोडपं दक्षिणी भाषेत बोलताहेत असं जाणवलं.. आणि का काय माहीत, त्यांच्याशी जाऊन बोलावं, त्यांच्याशी ओळख करून घ्यावी अशी इच्छा झाली.. अर्थात त्यांना त्याचा पत्ताही नसेल..
आणि माझं मलाच हसायला आलं. किती सहज बदलले आहे मी.
कधीतरी मी माझ्या शाळेची होते..
नंतर कॉलेजची झाले.. नंतर युनिव्हर्सिटीची..
हळूहळू पुण्याची ...महाराष्ट्राची झाले...
कदाचित काही वर्षांनी कुठेतरी माझीच ओळख मला मी भारतीय आहे म्हणूनही करून द्यावी लागेल..
एकंदरीत काय, माझं क्षितीज रुंदावतय ..
माझं विश्व विस्तारत जातंय.. माझ्याच नकळत...
No comments:
Post a Comment