Saturday, June 12, 2010

मरे एक त्याचा....

मृत्यू, एक कडवट सत्य.
 प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेलाच
मनुष्य असो वा जनावर, गरीब असो वा श्रीमंत,
सुखी असो वा दुखी, सज्जन वा दुर्जन.
तिथे भेदाभेद कधीच नाही.

उगवलेला सूर्य मावळणार हे जितकं सहज तितकंच..
जन्माला आलेला कधी ना कधी मरणार हेही.
मग तरीही हे सत्य सहज स्वीकारता का नाही येत?
दरवेळेला ते मनाला टोचणी देऊन का जातं?
आपल्या डोळ्यांपुढे कुणीतरी शेवटचे श्वास घेतो आणि तरीही..
तरीही आपण काही म्हणता काहीच नाही करू शकत
ही हतबलता अनुभवणं किती वेदनामय असता!

आपले जीवन पूर्णपणे जगून मग मृत्यू आल्यास एकवेळ हरकत नाही.
पण ज्यावेळी डोळे नीट उघडून जग बघायच्या आधीच मृत्यूला सामोरे जावे लागले तर?

का त्या छोट्या जीवाच्या नशिबी हा सारा खेळ?
अजून पंखसुध्दा फुटले नव्हते त्याला व्यवस्थित 
भरारीची आस असणं दूरच 
दाणापाणी खाण्यासाठी आपली चिमणी चोच उघडावी लागते हेही कळण्याचं वय नव्हतं त्याचं

काय बिघडलं असतं जर ते चिमणं पाखरू जिवंत राहिलं असतं तर?
बघितलं असतं त्यानेही ते निळशार आभाळ.
मारली असती एक स्वच्छंद फेरी उंच आभाळात
केला असता त्याच्या चिमण्या आवाजात गोड किलबिलाट…
खरंच, काही बिघडलं असतं का??

पण नाही.
आणि काळदेखील यावा कसा?
आपल्याच भाऊबंदाच्या रूपाने.
मजा वाटते का मृत्यूला
इतक्या कठोरपणे वागण्यातच?

जिवंत असतानाची त्याची थरथर,
उबेचा हात लागल्यावर थोडी कमी झाली होती..
पण तरीही काळापुढे आपण सारे फिकेच..
त्याच्या थंडावलेल्या शरीराला स्पर्श करताना माझ्याच शरीरावर शहारे उमटले
आणि आठवल्या समर्थांच्या ओळी…

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे…

1 comment: