Sunday, June 20, 2010

भूतकाळात डोकावताना... १

काय लिहू आणि कुठून सुरुवात करु तेच समजत नाहिये. आज माईआजी गेली. गेल्या चार महिन्यातली ही दुसरी घटना आणि गेल्या दोन वर्षातली सहावी. मोत्याची माळ तुटून एक एक करत मोती गळावेत तसतसे एक एक करुन सगळे गेले. आजी आजोबांच्या त्या पूर्ण पिढीचं अस्तित्व आता संपलय. इतक्या सार्‍या घटना इतक्या कमी काळात घडल्या आहेत, की आता डोळ्यातले अश्रूसुद्धा बंड करून उठलेत. मन मात्र प्रत्येकवेळी तितकंच सैरभैर होतं. आजही तसंच झालंय. सगळ्यांच्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत. त्या आठवणींचे मोती मी वेचण्याच प्रयत्न करतेय.
खरं तर कुठल्याच आजी आजोबांची मी ’अगदी लाडाची’ वगैरे अजिबातच नव्हते. अनेक नातवंडांपैकी मीही एक. पण आईचे काका काकू-ज्यांना मी काकाआजोबा आणि काकूआजी म्हणायचे, आईचे आई-वडिल म्हणजे माईआजी-दादाआजोबा आणि बाबांचे आई-वडिल -केंदूरचे आजी आजोबा यांच्याबद्दलच्या कितीतरी आठवणींनी कितीतरी वेळापासून माझ्या मनात फेर धरलाय.


काकाआजोबा आणि काकूआजी 


माझ्या शाळेपासून माझं आजोळ खूप जवळ होतं. शाळा सुटली की मी तिकडे जायचे. आई तिथे माझी वाट बघत थांबलेली असायची.
मग काकूआजी कधी थालीपीठ तर कधी साखरांबा-पोळी द्यायची. दुपारच्या वेळेला टी.व्ही वर ’हम पाँच’ आणि ’शांती’ नावाच्या सीरीयल्स लागायच्या. काकाआजोबा या सीरीयल्सचं नेहमीचं गिर्‍हाईक!!! त्यावेळी फार काही कळत नसताना (मुळात कळून घ्यायची आवश्यकता नसताना) मी ती त्यांच्याबरोबर बघायचे. ’हम पाँच’ चं attraction एव्हढ्यासाठी, की त्यात प्रिया तेंडूलकर फोटोतून बोलताना दाखवायचे. त्यावेळी ते फार गंमतशीर वाटे.
काकाआजोबांनी फुलवलेली बाग हा आवडीचा विषय. विशेषतः संध्याकाळच्या झाडांना पाणी घालायच्या वेळेची आम्ही आतुरतेनं वाट बघायचो. नळीने पाणी घालायची पहिल्यांदा संधी मिळावी म्हणून आजोबांकडे वशिला लावायचो. झाडांना पाणी घालणे यापेक्षाही पाणी घालायच्या नळीला पुढे बोट लावून सर्वात लांब फवारा कोणाचा जातो, यातच स्पर्धा असायची. अंगणात सडा घालण्याचं काम आम्ही मोठ्या हौसेनं करायचो. त्या नादात रस्त्यावरची जाणारीयेणारी लोकं भिजायची! तक्रार अर्थातच आजोबांकडे! पण पुनःश्च ’येरे माझ्या मागल्या’ व्हायला कितीसा वेळ लागतो?
जोवर पणजीआजी होती तोवर तिचा एक लिमलेट्च्या, श्रीखंडाच्या गोळ्यांचा खास असा डबा असायचा. खूश झाली, कि ती त्यातनं हळूच एक गोळी काढून हातावर ठेवी. इकडे काकाआजोबांच्या भाजक्या बडिशेपच्या डब्यावरही आमचा डोळा असायचा. त्या खास बडिशेपचे बकाणेच्या बकाणे आम्ही भरायचो.
काम करताना एकीकडे ’श्रीराम जय राम जय जय राम’ चा जप चालायचा. काहीही झालं की त्यांचं- "तो आहे ना वर बसलेला..बघतोय सगळं. तो माझा श्रीरामच मल सगळं देईल!" हे वाक्य कायम असायचं.
काकू आजी गेली तो दिवस अजून आठवतोय मला...गौरी जेवायचा दिवस होता तो. सौभाग्याचं लेणं लेवून -अहेवपणी ती गेली. तिच्या देहावर फुलं टाकून तिचं शेवटचं दर्शन घेताना असं वाटत होतं की जणू तिचा श्वासोच्छ्वास मंदपणे अजूनही चालू आहे. ती थरथर जी मला जाणवत होती ती खरोखरची होती की केवळ माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे मला तसा भास झाला होता हे माझ्यासाठी अजूनही न उलगडलेलं कोडं आहे.
काकूआजी हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट असताना एकदा माझ्या आईने तिच्यासाठी तांदुळाची उकड करून नेली होती. त्यातली तिने खाउन झाल्यावर उरलेली उकड मी संपवली होती. त्यानन्तर कित्येकदा आईने उकड केली, पण त्यादिवशीच्या उकडीची चव मला परत कधीच अनुभवायला मिळालेली नाही. आता तर तांदुळाची उकड आणि काकूआजी या दोन्ही आठवणी येताना  सोबत हातात हात घालूनच येतात..........

4 comments:

 1. I am spellbound. Speechless. Evdha bharbharun lihila ahes.. ani te wachtana pan khup bharun ala.
  "ती थरथर जी मला जाणवत होती ती खरोखरची होती की केवळ माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे मला तसा भास झाला होता हे माझ्यासाठी अजूनही न उलगडलेलं कोडं आहे." he vakya manaat ghusun ghar karun basla. Tuzya vichari, pan halwya zalelya manacha pratibimb dista ahe... kharokhar "Meghana in the Mirror"!!

  He wachtana mala mazya mai-ajji chi athvan zali. Hi mai-ajji mhanje mazi panji. Mazya aaichya aaichi aai. Mi ani mazi aai, amhi doghehi, kimbahuna amchya kade saglech tila mai-ajji mhanaycho. mi ticha ladka pantu. ti amha mulan barobar khup ramaychi. amchya barobar patte khelaychi. tichya mhatarpanamule zalelya luslushit twachechi amhala gammat wataychi. amhi tichya hatachi twacha halkech chimtit pakdaycho.. ani ti hasayla lagaychi. mai ajji la kadhi chimtach nahi basu shakat ashi amchi samjut hoti. amhi khelun alo ki ti sakhar-pani dyaychi.. ha prakar mi tya nantar kadhi pyayla nahi.. ek-don wela swatah sakhar pani karun pahila, pan ti godi nahi! ticha naav mala motha zalyavar kalla - Indira. ani asa pan kalla ki ti tarunpani Ozar gavachi sarpanch hoti, ani hya Indirechi Indira Gandhin barobar pan ekda bhet zali hoti.
  mai ajji kayam vahi madhe "shriram jairam" cha jap lihit ase. asa japani bharlelya kititari vahya hotya tichya kade. mag amhi pan ticha pen gheun tya vahit lihit asu. amchya lekhanacha "shri ganesha" peksha "shri-rama" ha tithech zala!
  Patte kheltana matra mai-ajji khup cheating karaychi. ticha avadta khel mhanje mendhi-kot. tichya team partner la hukum konta karava he ti khana-khuna karun sange. mag amhi 'cheating, cheating" asa ordayla laglo, ki ti patte khali theun tondacha bolka ughdun jor jorat hasu lage.

  aso.. mi reply lihayla ghetla ani lihinyachya bharat mazach puraan sangat baslo. pan mala hya saglya goshtinchi athvan karun denara tuza lekh.. ani kaku-aaj, kaka-ajoba, mai-ajji saglyanna maze sashtanga namaskar.

  ReplyDelete
 2. @ शंतनु:
  तुझी पणजीआजी सरपंच होती???????????
  त्या काळी एका स्त्री ने सरपंच असणं ही किती मोठी गोष्ट आहे.
  सहीच की..... फार कौतुक वाटलं हे वाचून!

  आणि (केंदूरच्या)आजीच्या सुरकुतलेल्या त्वचेची मलाही खूप मजा वाटायची. इतकी की माझी कधी गं होणार अशी त्वचा असं मी सतत तिला विचारत रहायचे ! :p
  आणि माझ्याही केंदूरच्या आजीचं नाव इंदिरा होतं!! तिच्याबद्दल मी लिहीनच स्वतंत्र पोस्टमधे.

  आणि हो, पुराणबिराण काही वाटलं नाही, तुला या सगळ्या गोष्टी त्यानिमित्ताने आठवल्या यातच सगळं काही आलं....

  ReplyDelete
 3. @ शंतनू आणि मेघना : आजी -आजोबाबद्दल सांगण्यास मी का बरे मागे राहू .परंतु येथे मला काहीच लिहिता येत नाहीये.सध्यातरी डोक्यात एव्हढच आहे की घरी जाऊन आजीच्या हातच्या सगळ्याच भाज्या आणि धापाटे( थालीपीठ ) खायचेत .आणि आजोबां जी भेळ आणतात ना सोमवारी वाळकीच्या बाजारातून त्याची कांदा ,टमाटे, कोथंबीर बारीक करून घातलेली आजोबांच्या आवडीची ओली भेळ बनवणार आहे ,त्यांच्या प्लेटमधली अर्धी भेळ माझ्याच वाट्याची असते बरका (@ मेघना :आजोबाच देतात बरंका नाहीतर तुला वाटायचं की तुझ्या प्लेटमधल्या पापडाला करते तसं करत असेल ,बिलकूल नाही बरंका ) . आणखी भरपूर कायकाय करणार आहे .आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांची बंगलोरला येण्याची तिकीट बुक करायचेत

  ReplyDelete
 4. @M&M (I mean Meera and Meghana... not Mahindra and Mahindra company) Thanks. Comment war comment hee height ahe!!
  मी लिहिता लिहिता इतकं लिहिलं आहे की तो एक अख्खा लेखच वाटतो आहे. कृपया माझी हि कमेंट डिलीट करू नये. मी पुढे मागे माझ्या blog वर अशीच्या अशी post टाकीन म्हणतो.
  @Meera - तुझे आजोबा आल्यावर आपण इथेही भेळेचा कार्यक्रम करूयात, पण तेव्हा भेळ आपण करणार आणि तुला वेगळी डिश घ्यावी लागेल.

  ReplyDelete