Friday, June 25, 2010

भूतकाळात डोकावताना...२

दादाआजोबा आणि माईआजी

दादाआजोबांबद्दल मी जेव्हाजेव्हा विचार करते तेव्हातेव्हा त्यांची शांत मूर्तीच डोळ्यासमोर येते. मी जेव्हढं त्यांना बघितलंय तेव्हढ्या सगळ्या आठवणींत त्यांची रागावलेली मुद्रा तर सोडाच पण कुणाबद्दल उणादुणा शब्द उच्चारल्याची साधी खूणही सापडत नाही. आजोबांची पूर्ण भगवद्गीता पाठ होती. ते बर्‍याचदा पूर्ण गीता वाचायचे. दुपारच्या शांत वेळी त्यांच गीतापठण चालू असताना आम्हाला त्याना डिस्टर्ब न करण्याचा इशारा मिळत असे. अर्थात त्यांना डिस्टर्ब केलं तरी ते कही ओरडाबिरडायचे नाहीत, पण मुळात त्याना बघून आम्हाला तशी इच्छाही नाही व्हायची. हृदयविकाराचा झटका येउन गेल्यानंतर त्यांनी स्वतःला जे maintain  केलं होतं ते खरोखर दाद देण्यासारखं होतं. वेळच्यावेळी औषधं घेणं, कुठली औषधं संपली आहेत, कुठली आणायची आहेत त्याची यादी करुन ती आणणं/आणवणं हे अगदी शिस्तीत आणि वेळच्या वेळी व्हायचं. कुणीही न सांगता सवरता!
त्यांच्या अतिशांत वृत्तीमुळे माईआजीचा मात्र भडका उडायचा कधीकधी!! माईआजी माझ्या आईची सावत्र आई. खरं तर हा शब्द उच्चारताना मला इतका त्रास होतोय की कुणी कल्पनाही नाही करु शकणार. ही गोष्ट मला फार उशीरा म्हणजे दहावीला गेल्यावर समजली. आईची आई गेली तेव्हा समस्त मामा-मावशी मंडळी लहान होती म्हणून माझ्या पणजोबांनी आजोबांना दुसरं लग्न करायला लावलं असं नंतर आईशी बोलताना समजलं. अर्थात त्याकाळी दुसर लग्न ही काही फार मोठी बाब नव्हती. याबद्दल इथे लिहीण्याचं खरं तर काहीच कारण नाही.पण मला अतिशय अभिमान वाटतो या गोष्टीचा की तो so called ’सावत्रपणा’ कुठल्याच बाबतीत अजिबात आड आला नाही. कधीच नाही.त्यामुळे जेव्हाजेव्हा मी या गोष्टीचा विचार करते तेव्हातेव्हा माझ्या मनातला तिच्याबद्दलचा आदर दुप्पट वाढतो.
किंबहुना मी माझ्या सगळ्या मामांमधे शैलेश-प्रसाद मामांच्या जास्त जवळ आहे. शनवारात राहत असेपर्यंत ठीक होतं, पण कोथरूडला शिफ़्ट झाल्यावर गावात खरेदीबिरेदीसठी जाताना आजीला मामी किंवा माझी आई सोबत लागायचीच. आजीच्या हातची शेवयाची खीर आणि चैत्रागौरीच्या वेळची कैरीची आंबट डाळ-पन्हं हे पदार्थ माझ्या विशेष आवडीचे होते.
आजी छोट्या छोट्या गोष्टींचंही कौतुक करायची. एकदा तर धुतलेलं धुणं मी नीट दांडीवर वाळत टाकल्यामुळे तिने मला खूश होऊन शाबासकी दिली होती. आदित्यने जेव्हा पहिल्या पगारातून त्यांना cordless phone घेउन दिला होत तेव्हा तिनं तो सगळ्यांना मोठ्या कौतुकाने दाखवला होता. नातवाचा अभिमान तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता.
तेव्हाच मीही ठरवलं होतं की मी पण नोकरी लागली त्यांच्या्साठी नक्की काहीतरी घेईन. या सार्‍या गोष्टींना आता फार उशीर झालाय खरं तर. काळाने ती संधी माझ्याकडून कढून घेतलीये. काळाचा तरी काय दोष म्हणा, माझ्या अजागळ पणामुळेच झालंय हे सगळं.
बंगलोरला आल्यावर दोनदा पुण्याला जाणं झालं. अनिरुद्धच्या बारशाच्या वेळी आजोबांना चालणं शक्य नसल्याने फक्त आजीच आली होती.नंतर जेव्हा फ़ेब्रुवारीत गेले तेव्हा गेल्याबरोबर आजोबांच्या जाण्याचा धक्का सहन करावा लागला होता. आजोबांचं शेवटचं दर्शन केवळ एका दिवसाने चुकलं! आणि आता चार महिन्यांतच आजीही गेली. तिच अखेरचं दर्शनच काय तर दहाव्यालाही मी तिकडे नसणार. मी इतकी कमनशिबी कशी???

No comments:

Post a Comment