खरं तर काय लिहावं हे सुचत नाहीये.. पण मन खूप भरून आलंय.. आणि डोळेही.. कुठेतरी मोकळं होणं आवश्यक आहे असं वाटतंय..
काही माणस आपल्याला कधीकाळी खूप जवळची असतात. काही कारणाने आपण लांब जातो.. लांब जातो ते शब्दशः आणि मनानेही. पण हीच जर माणस कधी कुठल्या कारणाने आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर परत भेटली तर? काय प्रतिसाद असतो आपला? काय असायला हवा? वियोग आणि पुनर्भेट यामधला काळ हा किती महत्त्वाचा आणि परिणामकारक असतो?
आज असंच काहीसं माझ्याबाबतीत झालाय. एक खूप जुन्या ओळखीचे कुटुंब, त्यांचा आणि आमचा मधली बरीच वर्षे संपर्क तुटला होता. बरेच वर्ष ते परदेशात आहेत आता. मध्यंतरी त्यांनी भारताला भेट दिली आणि आम्हालाही आवर्जून भेटायला आले. अर्थातच माझी आणि त्यांची भेट झाली नाही. पण आता फेसबुक च्या द्वारे आम्ही परत एकदा संपर्कात आलोय. आजच त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली.
पण का कोण जाणे, सगळ संभाषण थोडसं कोरडं वाटलं. अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीशी खूप वर्षानंतर बोलायची संधी मिळाली तर शब्दच सापडू नयेत का बोलण्यासाठी? तुझं काय चाललंय आणि माझं काय चाललंय याव्यतिरिक्त काहीतरी बोलण्यासाठी इतका आटापिटा करून शब्द शोधावे का लागावेत? इतका त्रास का व्हावा? तेही इतक्या जवळच्या व्यक्तींबाबतही? दुरावा म्हटला तर तसंही नाही खरतर...मधल्या काळाचे परिणाम इतके असावेत कि ज्याने दोन व्यक्तींमधल्या नात्याचे सगळे संदर्भच बदलून जावेत? आणि उरावा निव्वळ कोरडेपणा?
पण कोरडेपणा फक्त बोलण्यात होता, मनात नव्हता.. तरीही...
आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे आपल्याला चेहराच नाही ओळखता आला तर.. किंवा समोरच्या व्यक्तीला आपला चेहराच आठवत नसेल तर.. आणखीनच complicated situation !! खरंच, तिला तर मी अजिबातच आठवतच नाहीये. आणि मलाही तिचा चेहरा अगदीच पुसटसा आठवतोय. आमची शेवटची भेट झाली तेव्हा ती अगदी चार पाच वर्षांची असेल. आणि आता १२-१५ वर्षांच्या नंतर अचानक कसं काय ओळखणं शक्य आहे? अशी अपेक्षाही करणं चुकीचं नाही का?
आणिक जर असं असेल तर
संभाषणातल्या ओलाव्याच काय? जिथे चेहराच नाही आठवत तिथे बोलण्याचं काय घेऊन बसायचं?
प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न... या प्रश्नांची उत्तर मला मिळतील?