Monday, February 8, 2010

आठवणींच्या कप्प्यात ...

आठवणी हा माणसाला मिळालेला ठेवाच आहे की नाही? असे अनेक क्षण असतात की जे मनाच्या तळाशी कुठेतरी खोल जाऊन दडून बसले असतात. आणि अचानक केव्हातरी काही तरी निमित्ताने ( किंवा कधी कधी तेही नाही, एकदम अचानकच ) पुन्हा एकदा वर उफाळून येतात. काही आठवणी चांगल्या काही वाईट.. चांगल्या वाईट क्षणांची पोतडी म्हणजे आठवणी... हरवलेले दिवस पुन्हा अनुभवता येतात अशा वेळी. आणि कधी कधी तर अगदी ठरवून विसरलेल्या काही गोष्टी की ज्या अगदी त्रासदायक असतात त्यानाही आपल्याला सामोर जावं लागतं.

गम्मत असते नं किती? चिंचेचे एक बुटुक चघळताना सुद्धा आपण कधी त्या शाळेच्या मोरपंखी दिवसामध्ये जाऊन पोहोचू सांगता येत नाही. परवा एकदा सहजच दुकानात काहीतरी खरेदीसाठी गेले होते. तिथे एक मुलगी शाईपेन विकत घ्यायला आली होती. तिचा ते पेन select करणं मला सरळ माझ्या शाळेत घेऊन गेलं. त्यावेळचे ते पेन शी असलेले जिव्हाळ्याचे नाते .. दुसयाच्या पेन शी होणारी सततची तुलना.. शाईने सदैव भरलेली बोटे.. समोरच्या बाकावर बसणाऱ्या मुलीच्या युनिफॉर्म वर उडालेले शाई चे ठिबके.. मग होणारी थोडीशी धुसफूस .. आणि मग सॉरी म्हणाल्यावर होणारी बट्टी.. सगळं सगळं काही क्षणात आठवून गेलं.
आता मात्र पेन हातात धरण्याची वेळ येताच नाही मुळी फारशी. उचलली बोटे आणि लावली key बोर्ड ला.. सगळंच डिजिटल झालंय.

पण चला त्यानिमित्ताने का होईना मी पुन्हा त्या दिवसांची सहल करून आले. आणि अगदी थोडा वेळ का होईना मस्तपैकी जुने दिवस अनुभवले... हेही नसे थोडके!! नाही का?

1 comment:

  1. होना तू म्हणते ते खरच आहे साधं चिंचेच एक बुटुक आणि कोणाच्या हातात पाहिलेला पेन शाळेत नेवून बसवायला पुरतो.

    ReplyDelete